हैदराबाद: काश्मीरमध्ये लुडबुड करणं थांबवा. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे आणि यापुढेही राहील, अशा शब्दांमध्ये एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे. पाकिस्ताननं काश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची गरज नाही. काश्मीर प्रश्नात नाक घुसवणं पाकिस्ताननं बंद करावं, असं ओवेसी म्हणाले. ते हैदराबादमध्ये पक्षाच्या रॅलीत बोलत होते. जानेवारीच्या सुरुवातीला पाकिस्ताननं पुन्हा एकदा काश्मीरचा प्रश्न उपस्थित केला होता. पाकिस्तानी सैन्यातील वरिष्ठ अधिकारी असिफ गफूर यांनी भारतीय लष्करावर टीका केली होती. भारतीय सैन्याच्या कारवायांमुळे शूर काश्मिरींच्या मनातील स्वातंत्र्याची भावना दडपली जाणार नाही, असं ट्विट त्यांनी केलं होतं. याशिवाय भारतीय लष्कराकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असल्याचाही आरोप केला होता. भारतीय जवान नियंत्रण रेषेवरील गावातील नागरिकांना लक्ष्य करतात, असा दावादेखील त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर ओवेसींनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी काही दिवसांपूर्वी अहिष्णुता आणि गोसंवर्धानाच्या नावाखाली सुरू असलेल्या झुंडशाहीवर जोरदार टीका केली होती. त्यावर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी अल्पसंख्यांकांना कशी वागणूक दिली जाते, हे आम्ही दाखवून देऊ, असं उत्तर दिलं होतं. त्यावरुन हैदराबादचे खासदार ओवेसींनी खान यांना प्रत्युत्तर दिलं. 'पाकिस्तानी संविधानानुसार तिथे केवळ मुस्लिम व्यक्तीच राष्ट्रपती होऊ शकते. मात्र भारतात अल्पसंख्याक समाजाचे अनेक राष्ट्रपती होऊन गेले आहेत. त्यामुळे खान साहेबांनी आमच्याकडून सर्वसमावेश राजकारण आणि अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचे धडे घ्यावेत,' असं ओवेसी म्हणाले होते.