ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - बॉलिवूडच्या अभिनेत्यांना 'पानमसाला'ची जाहिरात न करण्याचे आवाहन करूनही काही प्रतिसाद न मिळाल्याने दिल्ली सरकारने आता त्यांच्या पत्नींनापत्र पाठवून आपल्या नव-याला या जाहिराती करण्यापासून रोखण्याचे आवाहन केले आहे. दिल्ली सरकारच्या स्वास्थ्य विभागातर्फे गौरी खान, काजोल, मलायका अरोरा-खान आणि सुनीता आहुजा यांना पत्र लिहून तुमच्या पतीला पानमसालाची जाहिरात करण्यापासून परावृत्त करा, अशी विनंती केली आहे.
या अभिनेत्यांतर्फे जाहिरात करण्यात येणा-या पानमसालामध्ये असलेल्या तंबाखूनज्नय पदार्थ नसले तरी त्यात सुपारी असते, जी कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे लोकांचे स्वास्थ्य ध्यानात घेऊन (जनहितार्थ) तुम्ही तुमच्या पतीला अशा प्रॉडक्ट्सची जाहिरात करण्यापासून रोखा. याप्रकरणी आम्ही या आधी तुमच्या (अभिनेते) पतीला पत्र पाठवले होते, मात्र त्याला अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नसून त्यांनी या (पानमसाला) जाहिराती करणेही थांबवलेले नाही' असे पत्र दिल्ली सरकारच्या स्वास्थ्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. एस.के. अरोरा यांनी अभिनेत्यांच्या पत्नींना लिहीले आहे. अभिनेता शाहरूख खानची पत्नी गौरी, अजय देवगणची पत्नी काजोल, अरबाज खानची पत्नी मलायका अरोरा आणि गोविंदाची पत्नी सुनीता यांना ही पत्र पाठवण्यात आली आहेत.
दरम्यान यापूर्वी अशाच आशयाचे पत्र अभिनेत्री सनी लिऑनीलाही पाठवण्यात आले होते व तिलाही तंबाकूजन्य उत्पादने व पानमसाला प्रॉडक्टसची जाहिरात न करण्याचे आवाहन करण्यात आले होते.