पश्चिम बंगालमधील भाजपचे बडे नेते सुवेंदू अधिकारी यांनी धक्कादायक विधान केले आहे. 'सबका साथ, सबका विकास' ही भाजपची घोषणा बदलण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुवेंदू अधिकारी म्हणाले, 'सब का साथ, सबका विकास, म्हणण्याची आवश्यकता नाही. जे आपल्यासोबत आहेत, आपण त्याची साथ देऊ, असे ठरवू. एवढेच नाही तर, आम्ही जिंकू आणि हिंदूंचा बचाव करू, असेही सुवेंदू म्हणाले. महत्वाचे म्हणजे, 'सबका साथ, सबका विकास' ही घोषणा सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती.
एका कार्यक्रमात बोलताना सुवेंदू अधिकारी म्हणाले, सबका साथ, सबका विकास घोषणेप्रमानेच अल्पसंख्यक मोर्चे देखील बंद करायला हवा. आम्ही संविधान वाचवू. यावेळी, त्यांनी पोट निवडणुकीतील भाजपच्या पराभवाचे कारणही सांगितले. यावेळी त्यांनी दावा केला की, पोटनिवडणुकीत हजारो मतदारांना मतदान करता आले नाही. एवढेच नाही तर, लोकसभा निवडणुकीतही लाखो हिंदूंना मतदान करू दिले नाही.
सुवेंदू अधिकारी यांच्या भाषणानंतर, त्यांनी आपल्या भाषणातून भाजप बंगालमध्ये हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाच्या दिशेने काम करेल, असे स्पष्ट केल्याचे मानले जात आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांनी एकजुट होऊन टीएमसीला ततदान केले. तर हिंदू मते वेगवेगळ्या पक्षांत विभागली गेली, असेही बंगाल भाजपचे म्हणणे आहे.
सुवेंदू यांनी लॉन्च केलं पोर्टल - यावेळी सुवेंदू अधिकारी यांनी एक पोर्टलही लॉन्च केले. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरही माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, मी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एक पोर्टल लॉन्च केले आहे. येथे, ज्यांना मतदान करू दिले गेले नाही, असे मतदार तक्रार करू शकतील. अशा लोकांची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.