इंफाळ : मणिपूरमध्ये ३ मे पासून आरक्षणावरून कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये हिंसाचार सुरूच आहे. हिंसाचाराच्या ४८ व्या दिवशी, रविवारी रात्री उशिरा पश्चिम इंफाळमध्ये जमावाने गोळीबार केला, त्यात लष्कराचा एक जवान जखमी झाला.दरम्यान, लोकांनी हिंसाचार थांबवावा अन्यथा त्यांना भीषण परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी सैनिकांवर झालेल्या गोळीबारावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली.
वाद लांबवण्याचा भाजपचा प्रयत्न : काॅंग्रेस भाजपला मणिपूरच्या समस्येवर तोडगा नको आहे आणि त्यांचा हा वाद लांबवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. “मणिपूर ४९ दिवसांपासून जळत आहे. पंतप्रधान ५० व्या दिवशी संकटाबद्दल एक शब्दही न बोलता परदेशात जाणार का?” असा सवाल पक्षाचे संघटनेचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी उपस्थित केला. रविवारी १० विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.