ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - इस्लाममधल्या वहाबी दहशतवादी विचारसरणीचा भारतात प्रसार होण्यापासून रोखायचा असेल तर मुस्लीम नेत्यांनी आणि राज्यकर्त्यांनी मुस्लीम तरुणांच्या आधुनिक शिक्षणावर आणि आर्थिक विकासावर भर द्यायला हवा असा सल्ला ऑर्गनायझर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातील एका लेखात देण्यात आला आहे. पंकज शर्मा या अमेरिकास्थित तज्ज्ञाच्या अभ्यासानुसार कुटुंबनियोजन आणि आर्थिक विकास भारतीय मुस्लीमांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
भारतासह जगभरामध्ये मुस्लीमांचे प्रमाण वाढत असल्याच्या अहवालांचा आधार घेत शर्मा यांनी २०३० मध्ये मुस्लीम हे भारतीय लोकसंख्येच्या १८ ते १९ टक्के असतिल हे नमूद केले आहे. तसेच भारतीय मुस्लीम मध्य पूर्वेतल्या काही देशांप्रमाणे कट्ट्ररतावादाकडे झुकणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत वहाबी दहशतवादी IS सारख्या माध्यमातून कशी मुस्लीम तरूणांना भरीस पा़डतात हे आपण बघितलेच आहे, त्यामुळे राज्यकर्त्यांनी व मुस्लीम नेत्यांनी आधुनिक आर्थिक विकासाचे मॉडेल व शिक्षण यांच्यावर भर देत या समस्येचा मुकाबला करायला हवा असे मत शर्मा यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय लाभ बाजुला ठेवूनभारताने वहाबी दहशतवादाला प्रोत्साहन देणा-या देशांशीही संबंध ठेवताना साधकबाधक विचार करायला हवा असे मत ऑर्गनायझरमध्ये व्यक्त करण्यात आले आहे.
भारतामध्ये अद्यापतरी मोठ्या प्रमाणावर मुस्लीमांनी वहाबीझमला तसेच दहशतावादाला थारा दिलेला नाही हे खरे असले तरी धर्मांतर व प्रसार करत लोकसंख्यावाढीच्या माध्यमातून दहशतवादी संघटना इस्लामचा वापर करत असल्याकडे शर्मा यांनी लक्ष वेधले आहे.
या प्रश्नाकडे वेळीच नीट लक्ष दिले नाही तर केवळ आशियासाठीच नाही तर जगासाठी भारत ही वहाबींची युद्धभूमी बनेल असा इशारा ऑर्गनायझरमध्ये देण्यात आला आहे.