नवी दिल्ली : बिहारच्या मुझफ्फरनगर येथील आश्रमशाळेत मुलींवर झालेले बलात्कार व लैंगिक छळ यांच्या सीबीआय तपासातून उजेडात आलेल्या कहाण्या भीषण व भयावह आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले आहे.न्या. मदन लोकूर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर या प्रकरणाच्या तपासाचा अहवाल सीबीआयने सादर केला. त्यावर खंडपीठाने म्हटले की, आश्रमशाळेसारख्या ठिकाणी इतके भयानक प्रकार का घडत आहेत? या आश्रमशाळेचा संचालक ब्रजेश ठाकूर याच्यावर सीबीआयने जे आरोप ठेवले त्याचीही न्यायालयाने नोंद घेतली. ठाकूरला अन्य राज्यातील तुरुंगात का हलविले जाऊ नये, याचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्याला नोटीस बजावली आहे.सीबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ब्रजेश हा अनेकांवर वचक राखून आहे. न्यायालयीन कोठडीत असूनही त्याच्याकडे नुकताच मोबाईल फोन आढळून आला होता. बिहारच्या माजी मंत्री मंजू वर्मा यांचे पती चंद्रशेखर वर्मा यांचा शोध घेण्यासाठी इतका वेळ का लागत आहे, अशी विचारणाही न्यायालयाने राज्य सरकार व सीबीआयकडे केली. मंजू व चंद्रशेखर वर्मा यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर दारूगोळा सापडला होता.मुझफ्फरनगर आश्रमशाळेतील लैंगिक छळाचे प्रकरण उजेडात आल्यानंतर बिहारच्या तत्कालीन समाजकल्याणमंत्री मंजू वर्मा यांना राजीनामा द्यावा लागलाहोता.>तपास विद्यमान पथकाकडेचमुझफ्फरनगर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास सीबीआय विद्यमान पथकाकडेच राहू द्यावा, असे सांगून न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० आॅक्टोबर रोजी ठेवली आहे.या प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या नव्या पथकाकडून केली जावी, या पाटणा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने १८ आॅक्टोबर रोजी स्थगिती दिली होती. असा बदल केल्यास सध्या सुरू असलेल्या तपासात अडथळे येतील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
आश्रमशाळेतील अत्याचाराच्या कहाण्या भीषण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 3:50 AM