नवी दिल्ली : मद्यसम्राट विजय मल्ल्या लंडनला पळून गेल्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असताना संसदेत गुरुवारी त्याचे पडसाद उमटले. मल्ल्या यांना देशाबाहेर जाऊ देण्यामागे गुन्हेगारी कट असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दुसरीकडे भाजपने संपुआच्याच काळात मल्ल्या यांना कर्ज देण्यात आल्याचा दावा करीत ते आमच्यासाठी ‘संत’ नाहीत असे सांगत जोरदार प्रत्युत्तर दिले.विरोधकांच्या हल्ल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली लोकसभेत म्हणाले की, एसबीआयच्या नेतृत्वातील १७ बँकांच्या कर्न्सोटियमने नोव्हेंबर २०१५ मध्ये मल्ल्या यांना ९०९१ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास परवानगी नाकारण्याचा कोणताही आदेश किंवा लूक आऊट नोटीस सीबीआयने बजावण्यापूर्वीच ते देश सोडून गेले होते. त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यासाठी बँकांनी न्यायालयात धाव घेण्याआधी त्यांनी देश सोडला होता. सरकारच्या उत्तरावर विरोधकांचे समाधान न झाल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डाव्यांनी सभात्याग केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)सभागृहाबाहेरही काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या प्रश्नावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला. विजय मल्ल्यांना देश सोडून जाण्याची परवानगी कशी देण्यात आली याचे उत्तर देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला.पंतप्रधानांनी लांबलचक भाषण दिले, मात्र माझ्या प्रश्नांना उत्तरे दिलेली नाही.राहुल गांधी यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना अरुण जेटली यांनी बोफोर्सचे भूत उकरून काढले. बोफोर्स प्रकणातील आरोपी ओट्टाव्हिओ क्वात्रोची याने भारत सोडून पलायन केले होते याचे स्मरण करवून देतानाच जेटलींनी मल्ल्यांना संपुआच्या काळातच कर्ज दिले गेल्याकडे लक्ष वेधले. मल्ल्या हे राज्यसभेचे सदस्य असल्याचा मुद्दा काँग्रेसने उपस्थित केल्याबद्दल जेटलींनी राहुल गांधींना राज्यघटनेचा अभ्यास करण्याचा सल्लाही दिला. मल्ल्यांना का रोखले नाही, या राहुल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, कोणालाही रोखताना कायदेशीर प्रक्रिया अवलंबली जाते. तुमचा पासपोर्ट जप्त केलेला असावा किंवा एखाद्या न्यायालयाचा तसा आदेश असावा लागतो. त्याशिवाय तुम्ही कुणाला देशाबाहेर जाण्यापासून रोखू शकत नाही.त्यांना समजावून सांगा...जेटलींनी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही, असा सवाल राहुल गांधी यांनी लोकसभेत केला होता. त्यावर जेटली म्हणाले की, २००४ आणि २००७ मध्ये मल्ल्या यांना कर्ज मंजूर करण्यात आले त्यावेळच्या तारखा मी दिलेल्या आहेत. २००९ मध्ये हे कर्ज अनुत्पादक(एनपीए) ठरले. त्यानंतर त्याची पुनर्रचना करण्यात आली. राहुल गांधी यांना उपरोक्त तारखा समजत नसेल तर मी काय म्हणावे. कुणीतरी त्यांना समजवायला मदत करा.>मल्ल्यांचा मुक्कामलंडनजवळील ‘लेडीवॉक’मध्ये? लंडन : विविध बँकांचे ९००० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे कर्ज न चुकविल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईला तोंड देत असलेले मद्याचे व्यापारी विजय मल्ल्या यांचे एक घर इंग्लंडमध्ये लंडनजवळ एका छोट्याशा गावात टिवेन येथे आहे. मल्ल्या सध्या इथे ‘लेडीवॉक’ या त्यांच्या बंगल्यात वास्तव्यास असल्याचे सांगितले जात आहे. हर्टफोर्डशायरमध्ये सेंट अलबंसजवळ टिवेन गावात मल्ल्या यांचा मोठा बंगला आहे. ३० एकरच्या परिसरातील या बंगल्याचे नाव आहे लेडीवॉक़ लंडनहून रस्त्याच्या मार्गाने येथे जाण्यासाठी एक तास लागतो. असे सांगितले जात आहे की, यूबी समूहाचे अध्यक्ष व राज्यसभा सदस्य मल्ल्या याच आठवड्यात सुरुवातीला येथे आले आहेत. भारतात मल्ल्या यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. त्यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी विविध बँकांचे ९००० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे कर्ज घेतले; पण त्याची परतफेड केली नाही.
विजय मल्ल्यांच्या पलायनावरून संसदेत वादळ
By admin | Published: March 11, 2016 3:25 AM