- सुरेश एस. डुग्गर
जम्मू : जम्मू-काश्मिरात शनिवारी या हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी मोठा विध्वंस झालेला दिसत आहे. तीन जण मृत्यूमुखी पडले आहेत. खोऱ्यामध्ये जोरदार पाऊस पडत असून, त्यामुळे श्रीनगर-जम्मू महामार्ग बंद करण्यात आला.दक्षिण काश्मिरातील पुलवामा जिल्ह्यातील नूरपोरा भागात पावसामुळे मातीचे घर कोसळले. ढिगाऱ्याखाली दबून एकाच परिवारातील तीन जण ठार झाले. या पावसामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.पहलगाममध्ये शनिवारी सकाळी या हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली. पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेल्या गुलमर्गमध्येही हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली. श्रीनगर जिल्ह्यात हलका पाऊस झाला.पीर की गली भागात बर्फवृष्टी झाल्यामुळे शोपियानमधील मुघल रोड वाहतुकीसाठी बंद केला गेला.बर्फवृष्टीमुळे खोऱ्यातील तापमान घसरले आहे. श्रीनगरमध्ये ५.६ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पहलगाम व गुलमर्गमध्ये अनुक्रमे ०.३ आणि १.५ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदले गेले.