श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात श्रीनगरसह अनेक भागांमध्ये शनिवारी तुफान बर्फवृष्टी सुरू झाली. या महिन्यातील ही तिसरी बर्फवृष्टी असून, ढगाळ हवामान असल्यामुळे तापमानात आणखी घट झाली आहे.
काश्मीरमध्ये तीन जानेवारीपासून सहग चार दिवस तुफान बर्फवृष्टी झाली होती. ९ जानेवारी रोजी मध्यम बर्फवृष्टी झाली. उत्तर काश्मीरमधील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट गुलमर्गमध्ये सुमारे १० इंच बर्फवृष्टी झाली. कुपवाडामध्ये तीन इंच तसेच अग्नेय काश्मीरमधील काजीगुंडमध्ये एक सेंटिमीटर व श्रीनगरमध्ये ०.२ सेंटिमीटर बर्फवृष्टी झाली. काश्मीर व जम्मू क्षेत्राच्या पर्वतीय भागांमध्ये तसेच इतर भागांतही बर्फवृष्टी झाल्याचे वृत्त आहे. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गाच्या जवाहर बोगद्याच्या दोन्ही बाजूंनी जोरदार बर्फवृष्टी झाली. तथापि, वाहतूक सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, श्रीनगर विमानतळाच्या रनवेवर बर्फ जमा झाल्यामुळे विमानांची वाहतूक प्रभावित झाली.
हवामान खात्याने सांगितले की, काश्मीरच्या मैदानी भागांमध्ये व जम्मूच्या पर्वतीय भागांमध्ये रविवारी दुपारपर्यंत हलकी ते मध्यम बर्फवृष्टी होऊ शकते. तसेच जम्मूच्या मैदानी भागांमध्ये पाऊस व गारांचा वर्षाव होऊ शकतो. खोऱ्याच्या सुदूर भागांत, विशेष करून पर्वतीय भागांत मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.काश्मीर खोऱ्यात ढगाळ हवामानामुळे लोकांना थंडीपासून उसंत मिळाली व खोऱ्याच्या बहुतांश भागांमध्ये रात्रीचे तापमान या हंगामाच्या तुलनेत सामान्य नोंदले गेले. श्रीनगरमध्ये तापमान शून्य ते दोन अंशाच्या खाली, तर गुलमर्गचे तापमान शून्य ते ४.८ अंशाच्या खाली राहिले.
काय आहे चिल्लई-कलां?काश्मीर आता चिल्लई-कलांच्या तडाख्यात आहे. हा ४० दिवसांचा कालावधी असून, या काळात येथे सर्वांत जास्त थंडी असते. काश्मीर खोरे शीतलहरच्या तडाख्यात सापडते व तापमान अनेक ठिकाणी शून्याच्या कितीतरी खाली जाते. या स्थितीत जलाशये व पाणी पाईपलाईनमध्ये गोठते. या काळात पर्वतीय भागांत सर्वाधिक बर्फवृष्टी होत असते. चिल्लई-कलां ३१ जानेवारी रोजी संपत आहे.