रांची:झारखंड राज्यातील गुमला जिल्हा आपल्या गुन्हेगारी कारवायांमुळे चर्चेत आला आहे. गुमला जिल्ह्यातील बसिया पोलीस स्टेशन परिसरातील मातरदेगा बास्तोली येथे काल रात्री दोन गावांमध्ये फुटबॉल मॅचवरून भीषण भांडण झालं. या घटनेत दोघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, तर अनेकजण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुमला जिल्ह्यातील बसिया पोलीस स्टेशन परिसरातील मातरदेगा बास्तोली येथे काल रात्री फुटबॉल सामन्यादरम्यान दोन गटांमध्ये वाद झाला. यानंतर, एका गटाच्या लोकांनी पातुरा गावात प्रवेश केला आणि बोलेरो आणि तीन मोटारसायकलींना आग लावली. यानंतर या दोन्ही गावातील गावकऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेत जिल्ह्याच्या घाघरा ब्लॉक मुख्यालयात असलेल्या केळी लागवडीचे संचालक लोकेश पुट्टास्वामी आणि सहयोगी एम देवा वासु ठार झाले. सोमवारी रात्री गुन्हेगारांनी धारदार शस्त्रांनी त्यांचा गळा चिरला. सध्या पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.
रात्री नेमकं काय झालं ?मिळालेल्या माहितीनुसार, मातरदेगा बास्तोली गावात पातुरा विरुद्ध पीठक टोळी दरम्यान फुटबॉल सामना चालू होता. या दरम्यान, रेफरीच्या निर्णयावरुन दोन्ही संघांमध्ये वाद झाला. यानंतर दोन्ही गावातील प्रेक्षकांमध्ये चकमक सुरू झाली. अचानक हा वाद इतका वाढला की मातरदेगा डुमरटोलीच्या काही लोकांनी पातुरा गावात घुसून बोलेरो आणि तीन मोटारसायकल पेटवून दिल्या.