नवी दिल्ली : संसदेत सोमवारी दोन्ही सभागृहांचे सत्र पुन्हा सुरू झाल्यानंतर ‘नीट’ पेपरफुटी, अग्निपथ उपक्रम, महागाई, बेरोजगारी यासारख्या अनेक मुद्द्यांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
लोकसभेत भाजपचे सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चेला सुरुवात करणार आहेत. लोकसभेने आभार प्रस्तावावरील चर्चेसाठी १६ तास दिले आहेत, ज्याचा समारोप मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराने होईल.
‘नीट’च्या मुद्द्यावरून संसदेत झाला हाेता माेठा गदारोळएनटीएद्वारे ५ मे रोजी सुमारे २४ लाख उमेदवारांसह नीट-यूजी परीक्षा घेण्यात आली. ४ जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता, परंतु त्यानंतर बिहारसारख्या राज्यांमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांसह इतर अनियमितता झाल्या. ‘नीट’वर चर्चेची मागणी करत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर लाेकसभेत चर्चा सुरू केली तेव्हा विराेधकांनी शुक्रवारी कामकाज तहकूब करण्यास भाग पाडले. राज्यसभेत चर्चेदरम्यान विरोधकांनी नीटवर चर्चेची मागणी केली आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे सभागृहाच्या हौद्यामध्ये गेले होते. त्यावर सभापतींनी नाराजी व्यक्त केली होती.
बुधवारी पंतप्रधान देऊ शकतात उत्तरराज्यसभेत चर्चेसाठी २१ तास ठेवण्यात आले असून, बुधवारी पंतप्रधान उत्तर देण्याची शक्यता आहे. राज्यसभेत चर्चेला सुरुवात करताना, भाजप सदस्य सुधांशू त्रिवेदी यांनी मोदींचे वर्णन अतुलनीय असे केले. भाजपच्या सदस्या कविता पाटीदार यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि नऊजणांनी आतापर्यंत चर्चेत भाग घेतला आहे.