अलाहाबाद- अलाहाबाद विश्वविद्यालयात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एमएच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या नागेंद्र सिंह या विद्यार्थ्यावर एका दुस-या विद्यार्थ्यानं गोळी झाडली. या गोळीबारात तो जखमी झाला आहे. तसेच नागेंद्र सिंह याला प्रतिस्पर्धी विद्यार्थ्यानं गोळी मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
जखमी विद्यार्थ्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक आकाश कुलहरी यांनी सांगितलं की, आरोपी विद्यार्थ्याची ओळख सरदार सिंह अशी पटली आहे. तो विद्यार्थी जोनपूरमधल्या बदलापूर येथे वास्तव्याला आहे. वैयक्तिक कारणातून त्यानं नागेंद्र सिंह याच्यावर हल्ला केला आहे. गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थ्याची स्थिती आता स्थिर आहे. त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली आहे.
जखम गंभीर नसल्यानं सध्या तरी धोका टळला आहे. मागील अनेक दिवसांपासून नागेंद्र आणि सरदार सिंह यांच्यामध्ये शत्रुता वाढली होती. त्याच कारणामुळे सरदार सिंह याला ब-याचदा होस्टेलमधून बाहेरचाही रस्ता दाखवण्यात आला होता. त्याचाच बदला घेण्यासाठी सरदार सिंह हा नागेंद्र सिंह याच्या क्लासरूमध्ये शिरला आणि त्याच्यावर गोळी झाडली.
तर काल रात्री 27 वर्षीय एस. एस. पाल या विद्यार्थ्यानंही गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गेल्या काही काळापासून त्रासलेला होता. पाल याच्या आईवडिलांचं निधन झालं होतं. तो पश्चिम बंगालमधला रहिवासी होती. त्यामुळे त्याच्या मृतदेहावर आता अलाहाबाद विश्वविद्यालयाचं अंत्यसंस्कार करणार आहे.