बाहुला-बाहुलींच्या लग्न सोहळ्याने ‘बोम्मारिल्लू’ ची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2015 2:17 AM
सोलापूर : तेलुगू भाषिक संस्कृती परंपरेप्रमाणे पूर्व भागात होणार्या ‘बोम्मारिल्लू उत्सवाची’ बाहुला-बाहुलींच्या लग्न सोहळ्याने सांगता करण्यात आली.
सोलापूर : तेलुगू भाषिक संस्कृती परंपरेप्रमाणे पूर्व भागात होणार्या ‘बोम्मारिल्लू उत्सवाची’ बाहुला-बाहुलींच्या लग्न सोहळ्याने सांगता करण्यात आली. जनाबाई जनार्दन बिटला शाळेतील सर्व मुले-मुली लगीन घाईत..कोणी नवरा-नवरीस सजविण्यात व्यस्त, तर कोणी लग्न व्यवस्था पाहण्यात मग्न, कोणी पाहुणचार करण्यात व्यस्त. आकाश मांडवाखाली होणार्या लग्नसोहळ्यासाठी भटजीचे आगमन झाले आणि घाई गडबडीत असलेल्या मुलांनी एकच गलका केला. भटजींनी लग्नविधीची सर्व तयारी करून नवरा-नवरीस लग्नमंडपात आणण्याचे निमंत्रण दिले. वधू-वराचे आगमन लग्न मंडपात झाले. भटजींनी मंत्रोच्चार करून शुभमंगल सावधान करीत नवरा-नवरीचे लग्न केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी फुलांचा वर्षाव करीत वधू-वरांना आशीर्वाद दिला. याप्रसंगी मुख्याध्यापिका गीता सादूल, सहशिक्षक अनिल गंजी, मधुकर मरगणे, नागरेखा बिंगी, शारदा गोरट्याल, शिक्षकेत्तर कर्मचारी अविनाश आडम, वनदेव खडके, कांचन दासरी आदी उपस्थित होते. विवाहाचे पौरोहित्य चक्रपाणी चिप्पा व सिद्धेश्वर चिप्पा यांनी केले. लग्न विधी आटोपल्यानंतर नवरा-नवरीची सवाद्य वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. हर्षोल्हासात मुलांनी नृत्य केले. दिवाळीतील फराळांचा सर्वांनी आस्वाद घेऊन भोजनावळी उरकल्या. शेवटी निरोपाच्या वेळी विद्यार्थी गहिवरून आले. जड पावलांनी निरोप घेत ‘बोम्मारिल्लू’ ची चर्चा करीत समारोप केला. (प्रतिनिधी)फोटो ओळ : जनाबाई जनार्दन बिटला शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ‘बोम्मारिल्लू’ उत्सवात बाहुला-बाहुलीच्या लग्नात अक्षता टाकताना विद्यार्थी.