ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 29 - प्रेमाला काही सीमा नसतात, मग त्या दोन देशांना विभागणा-या का असेनात...केरळमध्ये राहणा-या एका तरुणाला पाकिस्तानमधील तरुणीशी प्रेम झालं. दोघे सध्या भारतात असून बंगळुरु पोलिसांच्या रडारवर आहेत. कारण दोघांनीही कायद्याचं उल्लंघन करत भारतीय सीमारेषा पार करत घुसखोरी केली आहे. काठमांडूमधून 25 हजारात टॅक्सी बूक करत मोहम्मद शिहाबसोबत तीन पाकिस्तानी नागरिक पटना येथे पोहोचले. येथून सर्वजण ट्रेनने बंगळुरुला रवाना झाले.
केरळमध्ये राहणारा मोहम्मद शिहाब आपली पाकिस्तानी पत्नी समीरा अब्दुल रहमान आणि तिचे दोन नातेवाईक किरन गुलाम अली आणि काशिद समशुद्दीन यांच्यासोबत सप्टेंबर 2016 पासून काठमांडूत कॅम्प लावून बसला होता. भारतात घुसखोरी करण्यासाठी योग्य वेळ मिळण्याची वाट ते पाहत होते. मोहम्मद शिहाब यामागे आपली लव्हस्टोरी सांगत असला तरी पोलिसांना त्यांच्या या प्रेमावर संशय आहे. समीरा आणि शिहाब दोघांचेही जबाब एकमेकांशी जुळत नसल्याने पोलिसांचा संशय वाढला आहे.
समीरा गरोदर असून तिचा जबाब घेणं बाकी आहे. समीरा आपले वडिल आणि भावांसोबत कतारमध्ये राहत होती. त्यांचं तिथे एक डिपार्टमेंटल स्टोअर आहे. शिहाब जवळच्याच दुकानात ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. समीराच्या कुटुंबियांना दोघांचं प्रेम मंजूर नव्हतं. समीराचे कुटुंबिय तिला जबरदस्तीने पाकिस्तानात घेऊन आले, आणि त्यानंतर तिने पळून जाण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांनी कतरमधील गृहमंत्रालयाकडून या तीन पाकिस्तानी नागरिकांसंबंधी अधिक माहिती मागितली आहे. यांच्या नातेवाईकांचं कतर येथे डिपार्टमेंटल स्टोअर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "या पाकिस्तानी नागरिकांच्या भारतात घुसखोरी करण्याच्या कथेवर विश्वास करणं थोडं कठीण आहे. शिहाब आणि त्याच्या पत्नीचा नातेवाईक काशिफ यांच्या बोलण्यात विरोधाभास आहे". मोहम्मद शिहाब या तिन्ही पाकिस्तानी नागरिकांच्या एक आठवडाआधीच काठमांडूत पोहोचला होता.
आम्ही आमचा पासपोर्ट नेपाळमध्ये फेकला असून आमच्याकडे बोगस आधारकार्डव्यतिरिक्त दुसरं कोणतंच ओळखपत्र नाही असं या पाकिस्तानी नागरिकांनी तपास यंत्रणांना सांगितलं आहे. हे आधारकार्ड त्यांनी बंगळुरुत बनवले आहेत. पोलीस आधार कार्ड बनवून देणा-या एजंटचीही चौकशी करणार आहे.
इतकंच नाही तर हे सर्वजण एका भाड्याच्या घरात राहत असून दर महिना 10,500 भाडं देत आहेत. पण त्यांच्या कुटुंबात सध्या फक्त काशिम पैसे कमवत आहे. एका परफ्यूम दुकानात तो काम करत असून महिना 14 हजार पगार घेत आहे.