मसुरी - युपीएससी परीक्षा पास केल्यानंतर प्रशिक्षण घेण्यासाठी एकत्र आलेल्या भावी अधिकाऱ्यांच्या लग्नाची गोष्ट चांगलीच इंटरेस्टींग बनली आहे. लाल बहादूरशास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन येथे ट्रेनिंग घेणाऱ्या 156 आयएएस अधिकाऱ्यांच्या बॅचपैकी 12 जोडप्यांनी लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. 2017 च्या बॅचमधील एका ज्युनिअरने आपल्या सिनियरशी लग्नगाठ बांधली. तर 2016 पासून आजपर्यंत एक डझन जोडप्यांच्या प्रेमाला मसुरीतील प्रशिक्षण केंदातच अंकूर फुटला आहे.
आयएएस टीना दाबी आणि अतहर आमीर खान या आयएएस जोडप्यांची लव्ह स्टोरी देशभरात चर्चेचा विषय बनली. मात्र, जणू या आयएएस जोडप्याकडून प्रेरणा घेत इतरही आयएएस प्रशिक्षणार्थींनी ट्रेनिंगदरम्यान आपल्या सहकाऱ्यांसोबतच लग्नगाठ बांधली आहे. उत्तराखंडच्या मसुरी येथे नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात येते. येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अॅकॅडमीत भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवेच्या 'अ' वर्गातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. मात्र, सध्या मसुरीतील या प्रशिक्षण केंद्रात आयएएस अधिकाऱ्यांच्या लग्नाची गोष्ट चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, या प्रशिक्षण केंद्रातच अधिकाऱ्यांच्या रेशीमगाठी जुळून येत आहेत. दरम्यान, 2015 मधील युपीएससी टॉपर टीना दाबी आणि सेकंड रँकवर आलेल्या आमीर उल शफी खान यांनी एप्रिल 2018 मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाला देशातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. एकप्रकारे याचा आदर्श घेऊनच 2017 च्या बॅचममधील 6 प्रशिक्षणार्थीं आयएएस अधिकाऱ्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.