नवी दिल्ली : १९९१ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीला पी. व्ही. नरसिंह राव उभेच नव्हते. त्या निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत नरसिंह राव पंतप्रधान होतील, असे कोणालाच वाटले नव्हते.
निवडणुकांच्या काळातच राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यामुळे वातावरण बदलले आणि काँग्रेसला २४४ जागा मिळाल्या. म्हणजे बहुमतापेक्षा २९ कमी. पंतप्रधान कोण होणार, अशी चर्चा सुरू होती. एका गटाने शरद पवार यांचे नाव पुढे केले. त्याआधी महाराष्ट्रातील काही मंत्र्यांनी शरद पवार यांच्याविरोधात बंड केले होते. राजीव गांधी यांचाही पवार यांच्यावर विश्वास नसल्याचे बोलले जात होते. तरीही सुरेश कलमाडी यांनी पवार यांच्यासाठी लॉबिंग सुरू केले. विश्वंंभरदास मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी काँग्रेस खासदारांना बोलावून पवार यांना पाठिंबा देण्यासाठी सह्या गोळा करणे सुरू झाले. बऱ्याच खासदारांनी सह्या केल्या. काँग्रेसच्या कट्टर समर्थकांनी मात्र सह्या करण्यास नकारच दिला. शरद पवार यांनी निवडणूक लढवली नव्हती. बारामतीतून अजित पवार विजयी झाले होते. पण शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची इच्छा होती. काँग्रेस श्रेष्ठींनी नरसिंह राव यांना आंध्रातून बोलावून घेतले.
काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत नरसिंह राव यांचीच नेतेपदी निवड झाली. गांधी घराण्याशी असलेली निष्ठा हेच त्याचे कारण. ते पंतप्रधान झाले. त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री व शरद पवार यांना संरक्षणमंत्री केले. अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून राव यांनी बहुमतही सिद्ध केले. पुढे १९९३ साली राज्यात दंगली झाल्यानंतर राव यांनी पवार यांना पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठवले.लोकसभेची १९९१ ची निवडणूक न लढवणारे पी. व््ही. नरसिंह राव हे पंतप्रधान होतील, हे काँग्रेसजनांनाही वाटले नव्हते. त्यांच्या निवडीने सर्वांनाच आश्चर्यच वाटले.