ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. 27 - केवळ पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी एका आईने आपल्या मुलीवर बलात्कार करण्याच्या प्रयत्नात दोन अज्ञातांनी तिचा हात कापला, अशी खोटी बतावणी करत पोलिसांची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. मंगळवारी एका दलित मुलीवर बलात्कार करण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरलेल्या दोघांनी तिचे हात कापल्याची बातमी प्रसिद्धी माध्यमांनी लावून धरली होती.
मात्र, सत्य परिस्थिती काही वेगळीच असल्याचे समोर आले आहे. शौचालयासाठी रेल्वे रुळाजवळ जात असताना अपघातात या मुलीचा हात कापला गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. बलात्कार झाल्याची तक्रार दिल्यानंतर आर्थिक मदत मिळते, अशी माहिती या मायलेकींना ओळखीच्या व्यक्तीकडून मिळाली होती. त्यामुळे फक्त पैशांच्या लालसेपोटी या दोघींनी ही खोटी कहाणी रचली.
या मायलेकींनी पोलिसांना असे सांगितले की, ' रेल्वे रुळाजवळ शौचालयासाठी जात असताना, बाईकवरुन आलेल्या दोघांनी त्यांना घेरले. यानंतर एकाने मुलीला झाडाझुडपात ओढत नेले. यावर मुलीने विरोध करत आरडाओरडा केल्यामुळे त्यांनी तिचा हात कापला. या घटनेमुळे गंभीर जखमी झालेल्या मुलीला नातेवाईकांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.'
यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्यांना तिथे रक्त सांडलेले दिसले. मात्र अज्ञातांनी मुलीचा हात का कापला? आणि कापलेला हात ते स्वतःसोबत का घेऊन गेले?, या प्रश्नांमुळे पोलिसांनी संशय येऊ लागला. यानंतर वारंवार उलट-सुलट प्रश्न विचारल्यानंतर या मायलेकींना सत्य परिस्थिती स्वतःच सांगितली.
आरोपींचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण दिवस घालवल्यानंतर हे चीड आणणारे हे सत्य समोर आले आहे. मुलीने हात अज्ञातांनी कापल्याने नाही तर रेल्वे अपघातात गमावला, अशी कबुली तिच्या आईने दिली.