- विलास ओहाळ
पणजी : एस दुर्गा (मल्याळम चित्रपट) या चित्रपटात कोणताही भाग आक्षेपार्ह नाही. केवळ चित्रपटाच्या पोस्टरवरील नावावरून जो आक्षेप घेतला आहे, त्याला काही अर्थ नाही. केरळ उच्च न्यायालयाने निर्मात्याच्या बाजूने निर्णय दिल्याने इफ्फीमध्ये शेवटच्या टप्प्यात हा चित्रपट दाखवला जाईल, अशी आपणास आशा असल्याचे मनोगत या चित्रपटातील मुख्य भूमिका करणारा व कबीर पात्र रंगविणारा अभिनेता कन्नन नायर याने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.सेक्सी दुर्गावरून एस दुर्गा असे नामकरण झालेल्या आणि 48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरामामध्ये निवड होऊनही वादामुळे बाहेर पडलेल्या या चित्रपटाचा नायक नायर हा गोव्यात दाखल झाला आहे. या चित्रपटाविषयी त्याच्याशी गप्पा मारताना तो म्हणाला की, तसे आपण रंगभूमीवरील कलाकार. यापूर्वी 11 चित्रपटांतून छोटय़ा-छोटय़ा भूमिका केल्या. मात्र, सनल कुमार श्रीधरन यांनी या चित्रपटासाठी आपली मुख्य भूमिकेसाठी निवड केली.एस दुर्गा या चित्रपटात महिलेचा संघर्ष दाखविला आहे. दुर्गा म्हणजे लढाऊ पणाचे प्रतिक मानले जाते. कोणत्याही देवाचा किंवा मुलीच्या नावाचाही अपमान करण्याचा हा भागच नाही. उलट या चित्रपटातील दुर्गा ही भूमिका संघर्ष करणारी आहे. दुर्गाला जो भावनिक आधार देण्याचे, बळ देण्याचे काम कबीर करत असतो. त्याचबरोबत तिच्यावर प्रेमही करीत असतो. दुर्गाची भूमिका साकारणारी महाराष्ट्रातील राजश्री देशपांडे या अभिनेत्रीने या भूमिकेला न्याय दिला आहे. चित्रपट पूर्णत: दुर्गा या पात्रच्या भोवती फिरत आहे. विशेष म्हणजे इफ्फीमध्ये ज्युरींनी या चित्रपटाची निवड केली पण तो इफ्फीमध्ये समाविष्ट झाला नाही, याची खंत वाटतेच.केरळच्या लोकांची संख्या इफ्फीमध्ये अधिक असते. या चित्रपटाचा समावेश झाला असता, तर त्यांच्या आनंदातही भर पडली असती, असे सांगत नायर म्हणाला की, विनाकारण लोक कोणत्याही गोष्टीचा बाऊ करून घेतात. अशा पद्धती चुकीची प्रथा पाडणा-या ठरू शकतात. केरळमध्ये भारतीय जनता पक्षाने उलट या चित्रपटाच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांनी अजिबात या चित्रपटाला नाकारले नाही, ही या चित्रपटासाठी जमेची बाजू आहे.