नवी दिल्ली : काेविड १९ विषाणूचा अधिक वेगाने पसरणारा नवा स्ट्रेन आढळल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. नवा विषाणू ब्रिटनशिवाय इतरही देशांमध्ये आढळला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भारतासह अनेक देशांनी युराेपसह काही देशांमधील विमानसेवा तात्पुरती स्थगित केली आहे. नवा स्ट्रेन सुरुवातीला ब्रिटनमध्ये आढळला हाेता. लंडनसह दक्षिण ब्रिटनमध्ये काही भागांत या विषाणूमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याचे निदर्शनास आले हाेते. त्यानंतर, युराेपमधील आणखी काही देशांमध्ये नवा स्ट्रेन आढळल्याचे सांगितले आहे. आइसलँड, डेन्मार्क, बेल्जियम, इटली, स्वीडन आणि नेदरलँड या युराेपीयन देशांमध्ये नवा स्ट्रेन आढळला आहे. त्यामुळे अनेक देशांनी युराेपमधील विमानसेवा स्थगित केली आहे. फ्रान्समध्येही नव्या स्ट्रेनचा संसर्ग झाल्याचा संशय आहे, परंतु चाचण्यांमध्ये तसे निष्पन्न झालेले नाही. ब्रिटनमधून ऑस्ट्रेलियामध्ये गेलेल्या दाेन प्रवाशांमध्ये नवा स्ट्रेन आढळला हाेता. त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
आफ्रिकेतील विषाणू वेगळा?दक्षिण आफ्रिकेतही नवा स्ट्रेन आढळला आहे, परंतु हा विषाणू ब्रिटनमध्ये आढळलेल्या स्ट्रेनपेक्षा वेगळा असल्याचा दावा दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. काेविड १९ विषाणूवर विकसित करण्यात आलेली लस नव्या स्ट्रेनवर प्रभावी ठरते का, याबाबत दक्षिण आफ्रिकेमध्ये संशाेधन सुरू करण्यात आले आहे.
आपातस्थितीत कोरोना लसीच्या वापरास मंजुरी देणार; सीरम व फायझर स्पर्धेतजानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरण सुरू केली जाईल, अशी घोषणा सरकारने केली आहे. दुसरीकडे, कोरोनाच्या विषाणूचा नवा अवतार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सरकार आपातस्थितीत कोरोना लसीचा वापर करण्यास परवानगी देण्याची शक्यता दिसते. लसीकरणासंदर्भात प्राप्त संकेतानुसार भारत द्विस्तरीय योजनेवर काम करीत आहे. त्याुनसार फायझरची लस आयात करण्यासोबत सीरमच्या ‘अस्ट्राझेनेका’च्या लसीचा वापर करण्यास मंजुरी दिली जाऊ शकते.फायझर आणि सीरमने भारतीय औषधी महानियंत्रकांकडे (डीसीजीआय) आपातस्थितीत लसीचा वापर करण्यासाठी मंजुरी मागितलेली आहे. तथापि, डीसीजीआयने फायझर आणी सीरम इन्स्टिट्यूट (पुणे) आणि भारत बायोटेककडे (हैदराबाद) काही अतिरिक्त माहिती मागवली आहे.अमेरिका, ब्रिटन आणि इतर देशांत फायझरच्या लसीचा वापर सुरू करण्यात आलेला आहे. फायझरनेही स्पष्ट केले आहे, सरकारशिवाय आम्ही कोणत्याही खाजगी कंपनीला लस देणार नाही. कंपनीने अंतिम माहिती सादर केल्यानंतर ब्रिटनकडून ऑक्स्फर्डच्या लसीला २८ किंवा २९ डिसेंबर रोजी आपातस्थितीत वापर करण्यासाठी मंजुरी दिली जाऊ शकते. ब्रिटनची मान्यता मिळाल्यानंतर कोविशिल्ड लसीला भारताकडूनही मंजुरी दिली जाईल.