नवी दिल्ली - लॉकडाऊनमुळे राजधानी दिल्लीत गेल्या २ महिन्यांपासून अडकून पडलेल्या ५ वर्षीय चिमुकल्याने अखेर आपल्या घराकडे प्रस्थान केले. बंगळुरु विमानतळाववर या चिमुकल्या विहान (शर्मा) चं स्वागत करण्यात आलं. येथील केम्पेगौडा विमानतळावर सर्वच प्रवाशांची खबरदारी घेत घरवापसी होत आहे. या विमानतळावर पिवळ्या रंगाचं जॅकेट आणि तोंडावर मास्क घातलेल्या विहानचे आगमन झाले. त्यावेळी, आपल्या चिमुकल्यास घरी नेण्यासाठी त्याची आई मंजिश शर्मा विमानतळावर दाखल होत्या.
आपल्या हातात 'स्पेशल कॅटेगरी' असा बोर्ड घेऊन तो विमानतळावर चालत होता, त्यावेळी तब्बल दोन महिन्यानंतर त्याच्या आईने त्याला अलगद कवेत घेतले. विहान हा गेल्या २ महिन्यांपासून आपल्या आजोबांसोबत दिल्लीत राहात होता. तर, त्याचे आई-वडिल बंगळुरुत होते. लॉकडाऊनमुळे तो दिल्लीतील आजी-आजोबांकडे अडकला होता. बंगळुरु विमानतळावर आपल्या मुलाल घेऊन जाण्यास आलेल्या आईला आनंदाश्रू अनावर झाले होते. तब्बल ३ महिन्यानंतर माय-लेकराची भेट झाली.
देशभरात लॉकडाऊनमुळे लाखो प्रवासी अडकून पडले आहेत. सर्वचजण आप-आपल्या घराकडे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कुणी, बसने, कुणी ट्रेनने, कुणी खासगी वाहनाने घराची वाट पकडत आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर गेल्या १५ दिवसांत हजारो मजूर कामगार पायीच आपल्या घराकडे निघाले आहेत. विशेष म्हणजे तब्बल दीड हजार किलोमीटर पर्यंतचा प्रवास करुनही काहीजण आपल्या घरी पोहोचले आहेत. या प्रवासात कित्येकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. मात्र, मजूरांनी आपली पायपीट सुरुच ठेवल्याचं दिसून आलं.