नवी दिल्ली: संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 46 हजार 433 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1568 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये आतापर्यत सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. देशभरात गेल्या 24 तासांमध्ये 3900 नवे रुग्ण आढळले असून 195 लोकांचा मृत्यू झाला. मात्र एकीकडे देश कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आसाम रेल्वे पोलिसमधील उपनिरीक्षक पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या ५० वर्षीय महिलेवर पंजाबमधील फिरोझपूरमध्ये दोन जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेने फिरोझपूर पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केली असून आरोपींचा शोध सुरु करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पीडित महिला जम्मूमधील माता वैष्णो देवी मंदिर परिसरात कामासाठी येणार होती. मात्र देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ती फिरोझपूरमध्ये अडकली होती. यामुळे जीआरपीने या महिलेला काही दिवस मदत केंद्रावर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.
महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झाली आहे. माझे पत्नी रेल्वे पोलिसात कार्यरत होते. मात्र त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अनुकंपा तत्त्वावर मला जीआरपीमध्ये नोकरी मिळाली असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.