नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या दिल्लीतील घरात बुधवारी सकाळी पावणे आठ वाजता घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माझ्या शरीरात चिप बसविली असून, रिमोट कंट्रोलद्वारे माझे नियंत्रण करण्यात येत आहे, असा अजब दावा या घुसखोराने केला. तो मनोरुग्ण असावा, असा पोलिसांचा कयास आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही हा घुसखोर स्वत:शी खूप बोलत होता. त्याची तपासणी केली असता, त्याच्या शरीरात कोणतीही चिप आढळून आली नाही. तो बंगळुरूचा मूळ रहिवासी असून, त्याचे नाव शंतनू रेड्डी असे आहे. तो नॉयडा येथून एका कारने डोवाल यांच्या घरी आला. तिथे घुसखोरी करीत असताना सुरक्षा जवानांनी त्याला पकडले व पोलिसांच्या हवाली केले. डोवाल यांच्या घरी येण्याचा त्याचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास पोलीस करीत आहेत. अजित डोवाल यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. त्यांच्या संरक्षणासाठी सीआयएसएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. भारताचे जेम्स बाँड अशी ओळख असलेले अजित डोवाल यांचा माग काढल्याचा व्हिडिओ एका दहशतवाद्याकडे गेल्या वर्षी सापडला.
अनेक मोहिमांच्या आखणीत महत्त्वाची भूमिकाअजित डोवाल हे पाकिस्तानमध्ये नाव, वेश बदलून हेरगिरीसाठी सात वर्षे राहिले होते, असे सांगितले जाते. ऑपरेशन ब्लू स्टार, ऑपरेशन ब्लू थंडर यामध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या आखणीतही डोवाल यांचा महत्त्वाचा सहभाग होता.