हरयाणा व जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. थोड्याच वेळात निकालही जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. हरयाणात सुरुवातीला काँग्रेस आघाडीवर होती परंतू असा उलटफेर झाला की आता भाजपा मोठ्या बहुमताने आघाडीवर आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये भाजपा सुरुवातीपासून पिछाडीवर राहिली आहे.
हरयाणा निवडणुकीत मोठे उलटफेर पहायला मिळत आहेत. जुलानामधून विनेश फोगट पिछाडीवर असून सिरसा येथून गोपाल कांडा पिछाडीवर आहेत. तर दुष्यंत चौटाला उचाना कलामधून चौथ्या स्थानावर आहेत. काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार भूपेंद्र सिंह हुड्डा 11000 मतांनी पुढे आहेत. तर भाजपाचे प्रसिद्ध मंत्री अनिल विज अंबाला कँटमधून मागे आहेत.
या निवडणुकीत एक विचित्र परिस्थिती समोर येत आहे. मतमोजणीमध्ये काँग्रेसला सर्वाधिक मते मिळताना दिसत आहेत. परंतू, भाजपाचे उमेदवार सर्वाधिक जागांवर पुढे आहेत. सकाळी १०.३७ पर्यंत काँग्रेसला ४०.३९ टक्के मते मिळालेली आहेत. तर भाजपाला ३८.५९ टक्के मिळालेली आहेत. म्हणजेच काँग्रेसला १० लाख ३१ हजार मते तर भाजपला ९ लाख ८५ हजार मते मिळाली आहेत. असे असले तरी काँग्रेसच्या जागा कमी झाल्या आहेत व भाजपाच्या जागा वाढल्या आहेत.