- आदेश रावलनवी दिल्ली - राज्य सरकार व संघटनेतील दरी वाढत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना सरकार योग्य सन्मान देण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. राज्यात अधिकाऱ्यांचा बोलबाला आहे. आपल्याला सरकार व संघटनेतील दरी कमी करावी लागेल, असा सल्ला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना बुधवारी दिला आहे.
मागील महिन्यांत जेव्हा दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेशाबाबत बैठक बोलावण्यात आली होती, त्यावेळी छत्तीसगढच्या नेत्यांबरोबर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी चर्चा करू इच्छित होते. परंतु नीती आयोगाच्या बैठकीमुळे छत्तीसगढची बैठक होऊ शकली नव्हती.
सरकारकडूनच लोकांच्या अपेक्षा- छत्तीसगढच्या प्रभारी कुमारी शैलजा यांनीही म्हटले आहे की, जेव्हा सरकार असते तेव्हा हे स्वाभाविक आहे. तुम्ही हे नकारात्मक पद्धतीने घेऊ नका. - जेव्हा सरकार येते तेव्हा सरकारकडूनच अपेक्षा व्यक्त केल्या जातात. तेव्हा कार्यकर्ते, पक्षाचे लोकही सरकारकडूनच अपेक्षा ठेवतात. या वर्षाच्या अखेरीस छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, त्याच्याच तयारीसाठी दिल्लीत ही पहिली बैठक बोलावण्यात आली होती.