नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील दादरीत गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून एका मुस्लिम व्यक्तीच्या हत्याकांडानंतर देशात ठिकठिकाणी पसरलेला असंतोष अद्याप शमलेला नाही, तर दुसरीकडे राजकीय पक्षांच्या नेत्यांकडूनही या मुद्यावर प्रक्षोभक वक्तव्ये सुरूच आहेत.उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये गोहत्येच्या अफवेनंतर प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने पोलिसांची वाहने आणि दुकाने जाळली. हिंसाचारात सात पोलीस जखमी झाले. याप्रकरणी शनिवारी एका पोलीस अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले असून २१ जणांना अटक झाली आहे.एका अपक्ष आमदाराद्वारे गोमांस पार्टीचे आयोजन आणि उधमपूर जिल्ह्यात कथित गोहत्येच्या विरोधात जम्मूत कडकडीत बंद पाळण्यात आला.दरम्यान, दादरीतील तणाव कमी करण्याच्या उद्देशाने सद्भावना उपवासासाठी बिसहडा गावात जात असलेल्या उत्तर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी दिल्ली-नोएडा सीमेवरच रोखले. त्यामुळे अनेक तास झालेल्या ट्राफिक जाममुळे लोकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. लखनौच्या मैनपुरी येथून प्राप्त वृत्तानुसार करहल पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या नगरिया गावात शुक्रवारी गोहत्येची अफवा पसरल्यानंतर हिंसाचार माजला. काही समाजकंटकांनी जातीय वैमनस्य निर्माण करण्यासाठी ही अफवा पसरविली होती. शवविच्छेदनात गायीचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी बेपर्वाई दाखविल्याबद्दल पोलीस अधिकारी सुनीलकुमार यांना तातडीने निलंबित करण्यात आले असल्याचे गृह विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. जम्मूत अपक्ष आमदार इंजिनिअर राशीद यांच्याद्वारे गोमांस पार्टीचे आयोजन आणि उधमपुरातील गोहत्येचा निषेध नोंदविण्याकरिता जम्मू-काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टीने (जेकेएनपीपी) बंदचे आवाहन केले होते. बार असोसिएशन जम्मूसह विविध धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला होता. बंद काळात वाहतूक जवळपास ठप्प राहिली. जेकेएनपीपी कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागात निदर्शने दिली. आमदार राशीद यांच्या अटकेची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी राशीद आणि राज्य सरकारचे पुतळेही जाळले. जम्मू क्षेत्रातील उधमपूर, कठुआ आणि रियासी या तीन जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी गोहत्येच्या विरोधात बंद पुकारण्यात आला होता. काँग्रेस नेत्यांना रोखलेकाँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शनिवारी दादरी तहसिलीत जाऊन सद्भावना उपवास करण्याची घोषणा केली होती; परंतु प्रशासनाने परवानगी नाकारल्यावर शांती मार्चचा निर्णय झाला होता. त्यानुसार पक्षाचे नेते मोठ्या संख्येत सेक्टर-१४ए मधील नोएडाच्या प्रवेशद्वारावर गोळा झाले. या नेत्यांमध्ये उत्तर प्रदेशचे प्रभारी मधुसूदन मिस्त्री, माजी प्रदेश अध्यक्ष रिता बहुगुणा, आर.पी.एन. सिंग,जतीनप्रसाद, निर्मल खत्री, नसीबसिंग आदींचा समावेश होता. मात्र प्रशासनाने काँग्रेसला शांती मार्चही काढू दिला नाही, असे पक्षाचे प्रवक्ते पवन शर्मा यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
गोमांस व गोहत्येवरून अनेक भागांत तणाव
By admin | Published: October 11, 2015 2:58 AM