नवी दिल्ली - देशाची राजधानी आणि केंद्र शासित प्रदेश असलेल्या दिल्लीत केजरीवाल सरकारने महिलांना बससेवा आणि मेट्रो मोफत केली आहे. जाहीरनाम्यात दिल्याप्रमाणे केजरीवाल यांनी शब्द पाळत महिलांना दिल्लीत सार्वजनिक सरकारी बसमधून मोफत सेवा देण्यास सुरुवात केली. या सेवेचा लाभही लाखो महिला घेत आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात महिलांना एसटी तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आली. याचाही परिणाम झाला असून महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मात्र, महिलांना मोफत प्रवास दिल्याने होत असलेला भेदभाव एका व्हिडिओतून समोर आला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, या व्हिडिओतील बसचालकावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही केजरीवाल यांनी बजावले आहे. आता, या व्हिडिओत नेमकं काय आहे हे जाणून घेऊ. या व्हिडिओत दिल्लीतील परिवहन विभागाची बस एका स्टॉपवर येते. या बसमधून काही प्रवाशी खाली उतरतात. मात्र, त्याचेवळी बस स्टॉपवर असलेल्या महिला प्रवाशांना बसमध्ये बसायचं असतं. पण, बस ड्रायव्हर गाडी अगोदर पुढे नेतो आणि न थांबवता निघून जातो. त्यामुळे, बसमध्ये बसू इच्छिणाऱ्या महिलांना प्रवास करता येत नाही. मग, बस ड्रायव्हरने हे कृत्य का केले असेल, तर महिला प्रवाशांना मोफत बसमधून प्रवास आहे. त्यामुळे, बस ड्रायव्हरने महिलांना बसमध्ये घेऊन काय फायदा, असा विचार करत ही बस पुढे नेली असावी, अशी चर्चा व्हिडिओ पाहून होत आहे. त्यामुळेच, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी व्हिडिओ ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.
महिलांना बसमधून मोफत प्रवास असल्याने त्यांना पाहून बस थांबवण्यात येत नाही. किंवा महिला प्रवाशांना टाळलं जातंय, अशा तक्रारीही येत आहेत. हे कृत्य कदापी सहन केलं जाणार नाही, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुनावलं आहे. तसेच, या बस चालकावर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.