नवी दिल्ली : ‘चौकीदार चोर है’ या घोषणेवर मी आणि माझा पक्ष ठाम आहे, अशा आशयाचे वक्तव्य न्यायालयाच्या तोंडी घालण्याच्या अनवधानाने घडलेल्या चुकीपुरतीच मी दिलगिरी व्यक्त केली आहे, अशी भूमिका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर अवमानना प्रकरण (कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट) चालविण्याची नोटीस मंगळवारी जारी केली. मात्र, राहुल गांधींना हजर न राहण्याची तूर्तास मुभा देण्यात आली.या वक्तव्याबद्दल राहुल यांच्यावर न्यायालयीन अवमाननेची कारवाई करावी, अशी याचिका भाजपच्या मीनाक्षी लेखी यांनी केली आहे. राहुल यांनी वक्तव्याचा खुलासा करणारे प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर हे प्रकरण सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठापुढे आले. लेखी यांच्यातर्फे अॅड. मुकुल रोहटगी व राहुल गांधी यांच्यातर्फे अॅड. अभिषेक मनू सिंघवी यांचे म्हणणे ऐकल्यावर खंडपीठाने गांधी यांना ‘कन्टेम्प्ट’ची नोटीस जारी केली. राहुल गांधींवर ‘कन्टेम्प्ट’ची कारवाई व्हायला हवी, असा अग्रह धरताना अॅड. रोहटगी म्हणाले की, न्यायालयाच्या तोंडी चुकीचे वक्तव्य घातल्याची कबुली गांधी यांनी दिली आहे. त्यावेळी न्यायालयाचा निकाल वाचला नव्हता व जोशाच्या भरात ते वक्तव्य तोंडून निघाले, असे लंगडे समर्थन त्यांनी केले आहे.गांधी यांनी प्रतिज्ञापत्रात एकाच ठिकाणी ‘दिलगिरी’ शब्द कंसात वापरला आहे. ही दिलगिरी तोंडदेखली आहे, असे सांगत रोहटगी म्हणाले की, राहुल गांधी यांच्या ‘चौकीदार’ म्हणण्याचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. ‘चौकीदार चौर है’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याचे ते सांगत फिरत आहेत. राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत कसे वागतो हेच यावरून दिसते. ते म्हणाले की, राफेल प्रकरणाच्या निकालात न्यायालयाने सरकारला ‘क्लीन चिट’ दिलेली नाही. तरीही भाजपचे नेते तसे सांगत आहेत; पण तेवढ्यावरून ‘कन्टेम्प्ट’ दाखल करण्यास आम्हाला वेळ नाही.काय म्हणाले न्यायालय?अॅड. सिंघवी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय ‘चौकीदार चौर है’ असे कधी म्हणेल याची कल्पनाही करता येणार नाही. ‘चौकीदार’ या शब्दाशी निगडित घोषणा गेल्या १८ महिन्यांत देशातील राजकारणात दोन्ही बाजूंकडून सातत्याने वापरल्या जात आहेत.‘चौकीदार चोर है’ या घोषणेवर राहुल गांधी ठाम आहेत. त्यांनी जी दिलगिरी व्यक्त केली आहे, ती फक्त ते शब्द न्यायालयाच्या तोंडी घातल्याबद्दल आहे.
‘चौकीदार’वर ठाम; राहुल गांधींना कन्टेम्प्ट नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 3:49 AM