नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाचे बेपत्ता विमान एएन-32 चे अवशेष मिळाल्यानंतर आता त्यावर राजकारणाला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षाने या मुद्द्यावरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. गुजरातमधील काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी विमान गायब होण्याच्या घटनेला चीनशी जोडून सर्जिकल स्ट्राईक करण्याचं विधान केलं आहे. ज्यावरुन मोदी सरकारमधील मंत्री किरण रिजिजू यांनीही हार्दिक पटेलला उत्तर दिलं आहे.
हार्दिक पटेलने गदर सिनेमातील सनी देओलच्या डायलॉगचा आधार घेत ट्विट केलं आहे की, चीन मुर्दाबाद होता आणि मुर्दाबाद राहील. आपलं विमान एएन 32 आणि जवान चीनला परत द्यावं, मोदीजी तुम्ही चिंता करु नका, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. चीनवर सर्जिकल स्ट्राईक करुन आपल्या जवानांना परत आणा असं हार्दिकने म्हटलं आहे.
हार्दिकच्या या ट्विटवरुन केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी भाष्य करत तुम्ही काँग्रेस पक्षाचे नेते आहात. तुम्हाला अरुणाचल प्रदेश देशात कुठे आहे याची माहिती आहे का? जर विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशात मिळाले असतील तर त्याचा संबंध चीन कसा जोडला यावर रिजिजू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय हवाई दलाच्या ३ जून रोजी कोसळलेल्या मालवाहू विमानाच्या अवशेषाचा काही भाग अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यातील पायुमजवळील दुर्गम भागात आढळल्याचे सांगण्यात आले. हे विमान आसामच्या जोरहाटहून अरुणाचल प्रदेशच्या मेचुका या लष्करी तळाकडे निघाले होते. या विमानात ८ कर्मचारी व ५ प्रवासी, असे १३ जण होते. एका आठवड्यानंतर विमानाचे अवशेष सापडल्याने त्यातील कर्मचारी जिवंत असण्याची शक्यता कमी आहे. अर्थात अवशेष व कर्मचारी यांचा बारकाईने शोध घेण्यात येत आहे. हे विमान कशामुळे कोसळले, याचाही आता तपास करण्यात येईल. हे विमान ३ जून रोजी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी जोरहाटहून निघाले होते; पण दुपारी एक वाजण्याच्या सुमारात त्याचा संपर्क तुटला होता. या विमानाचे अवशेष पायुमजवळील दुर्गम भागात आढळल्याचे हवाई दलाने ट्विटद्वारे कळविले