एसटीच्या थांब्यावर ट्रॅव्हल्सचे अतिक्रमण -ट्रॅव्हल्सवाल्यांची सर्रास टप्पा वाहतूक : प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2015 12:57 AM
नागपूर : उपराजधानीत काही खासगी ट्रॅव्हल्सवाले सर्रास टप्पा वाहतूक करतात. एसटीच्या थांब्यावर आपल्या बसेस उभ्या करून प्रवासी बळकवतात.
नागपूर : उपराजधानीत काही खासगी ट्रॅव्हल्सवाले सर्रास टप्पा वाहतूक करतात. एसटीच्या थांब्यावर आपल्या बसेस उभ्या करून प्रवासी बळकवतात. खासगी ट्रॅव्हल्सच्या या बेजबाबदारपणामुळे प्रवाशांची सुरिक्षतता धोक्यात आली आहे. दुसरीकडे हे थांबे एसटीचे की ट्रॅव्हल्सचे हा प्रश्नही निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि वाहतूक पोलीस विभाग या दोघांना कारवाईचे अधिकार आहेत. मात्र, रहाटे कॉलनीपासून ते इंदोरा चौकापर्यंत वाहतूक पोलिसांच्या देखत हा प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून बिनबोभाट सुरू आहे. गणेशपेठ येथील मध्यवर्ती बसस्थानकापासून २०० मीटर अंतरावर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना अधिकृत बंदी आहे, या बसस्थानकाच्या परिसरात याचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येते. गणेशपेठ चौकातच वाहतुकीचे सर्वच नियम धाब्यावर बसविले जातात. ट्रॅव्हल्स भर रस्त्यावर उभी करून प्रवाशांना ओरडूनओरडून बोलविले जाते. काही ट्रॅव्हल्सवाले तर रस्त्याच्यामधोमध गाडी सुरू करून मागे-पुढे करीत असतात. सकाळी ८ ते दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजताच्या दरम्यान हा प्रकार सुरू होतो. प्रवासी मिळविण्याच्या स्पर्धेत अनेक ट्रॅव्हल्सवाल्यांची लांबलचक रांग लागलेली असते. काही ट्रॅव्हल्स मालकांनी चौकाच्या आजूबाजूला आपले दुकान थाटले आहेत. दुकानासमोरील पार्किंगच्या ठिकाणी हे आपली ट्रॅव्हल्स बस घुसवून ठेवतात, आणि जेव्हा जाण्याची वेळ येते तेव्हा वाहतुकीची पर्वा न करता रस्त्यावर आणतात. -प्रवाशांना ओरडून बोलवितातइंदोरा चौक, बैद्यनाथ चौक, गणेशपेठ चौक, गीतांजली चौक, मानस चौक, बोले पेट्रोल पंप चौक, छत्रपती चौक, रविनगर चौक, सक्करदरा चौक येथे खासगी ट्रव्हल्सवाल्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. यातील अनेकांकडे ट्रॅव्हल्स बस उभी करण्याची सोय नाही. परिणामी या बसेस रस्त्यावर उभ्या असतात. यांचे एजंट प्रवाशांना ओरडून-ओरडून बोलवितात. यामुळे वाहतुकीची कोंडी व प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.