शामली : नोएडा येथील पत्रकार प्रशांत कनौजिया यांना उत्तर प्रदेशातीलपोलिसांनी अटक केल्याचे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा येथील पोलिसांनी एका पत्रकाराला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली.
दिल्ली-सहारनपूर रेल्वे ट्रॅकवरुन मालगाडीचे डब्बे घसरल्याचे रिपोर्टिग करणाऱ्या एका वृत्तवाहिनीचे पत्रकार अमित शर्मा यांना जीआरपीच्या पोलिसांनी बेदम मारहाण केली. तसेच, पोलिसांनी दारुणच्या नशेत बेदम पत्रकार अमित शर्मा यांना मारहाण करत ठाण्यात घेऊन गेले. यावेळी पोलीस ठाण्यात पत्रकार अमित शर्मा यांचे कपडे फाडले आणि त्यांच्या अंगावर पोलिसांनी लघुशंका केली, असा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, या मारहाणीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
शामलीतील धीमानपुरा फाटकजवळ मंगळवारी रात्री दिल्ली-सहारनपूर मालगाडीचे दोन डब्बे आणि गार्डचा डब्बा पटरीवरुन घसरले होते. त्यामुळे दोनशे मीटरचा रेल्वे ट्रॅक पूर्णपणे खराब झाला होता. या घटनेचे रिपोर्टिंग करण्यासाठी पत्रकार अमित शर्मा गेले होते. त्यावेळी जीआरपीचे पोलीस निरीक्षक राकेश बहादूर सिंह आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी पत्रकार अमित शर्मा यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण केली. तसेच, त्यांच्याकडील मोबाईल आणि कॅमेऱ्याची तोडफोड केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले असून याप्रकरणाची चौकशी सुरु आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत्रकार प्रशांत कनौजिया यांची सुटका करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिले आहेत. तसेच, अशाप्रकारे एखाद्या नागरिकाच्या अधिकारांचे हनन केले जाऊ शकत नाही, असे सांगत सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश पोलिसांना फटकारले आहे.
प्रशांत कनौजिया यांनी हा व्हिडीओ शेअर करून मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत शुक्रवारी रात्री लखनऊमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हजरतगंज पोलिसांनी दिल्लीतून प्रशांत कनौजिया यांना अटक करण्यात आली होती. या अटकेप्रकरणी प्रशांत कनौजिया यांच्या पत्नीने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती.