गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल 2 जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी नुकताच काँग्रेसचा राजीनामा दिला होता. ते गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष होते. सातत्याने होत असलेल्या उपेक्षेमुळे ते नाराज होते. गांधी नगर येथील भाजप मुख्यालयात पोहोचून ते भाजपत प्रवेश करतील.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हार्दिक पटेल यांनी 2 जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची पुष्टी केली आहे. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील त्यांना भाजपचे सदस्यत्व देतील. यावेळी हार्दिक यांच्या सोबत त्यांचे काही समर्थकही भाजपत दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे. हार्दिक पटेल यांच्या भाजप प्रवेशाचे एका भव्य कार्यक्रमात रूपांतर करण्याची भाजपची इच्छा आहे.
पाटीदार समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपला मिळणार मोठी मदत - हार्दिक पटेलसोबत जवळपास 1500 समर्थकही भाजपमध्ये सामील होणार असल्याचे बोलले जात आहे. हार्दिक यांचा भाजप प्रवेश पाटीदार राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. हार्दिक पटेल 2015 मध्ये गुजरातेत झालेल्या पाटीदार आरक्षण आंदोलनाचा मुख्य चेहरा होते.
हार्दिक पटेलांच्या काँग्रेस प्रवेशानंतर, आता आपल्याला पाटीदार समाजाचे समर्थन मिळेल, असे काँग्रेसला वाटत होते. मात्र, 2017 च्या विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करूनही काँग्रेस सत्तेपासून दूरच राहिली होती.
निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला तगडा झटका -हार्दिक यांनी भाजपत प्रवेश करणे, हा काँग्रेससाठी निवडणुकीपूर्वीच मोठा झटका मानला जात आहे. काँग्रेस आधीच सातत्याने होणारे नेत्यांचे पलायन रोखण्यात अयशस्वी ठरत असल्याचे दिसते. मात्र, हार्दिक पटेलसंदर्भात भाजपकडून अद्याप कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा झालेली नाही.