गुजरात निवडणुकांमध्ये काँग्रेसचे तगडे आव्हान, आपकडून त्रास
By यदू जोशी | Published: November 28, 2022 11:06 AM2022-11-28T11:06:09+5:302022-11-28T11:06:57+5:30
तरीही अहमदाबादमध्ये ॲडव्हान्टेज भाजप
यदु जोशी
अहमदाबाद : अहमदाबाद या आपल्या बालेकिल्ल्यात भाजपची मुख्यत्वे लढत आहे ती काँग्रेसशीच पण आम आदमी पार्टीकडून मतविभाजनाची भीती भाजपला सतावत आहे. मात्र, मोदी-शहांची प्रतिमा, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची प्रतिष्ठा अन् केलेली विकासकामे आणि मोठा परंपरागत मतदार या जोरावर सध्याचे चित्र ॲडव्हान्टेज भाजप असेच आहे.
आप कदाचित १ही जागा जिंकणार नाही पण अँटिइन्कम्बन्सीमुळे भाजपवर नाराज असलेले मतदार आपकडे वळले तर फायदा काँग्रेसला होईल. ते होऊ नये म्हणून आपला मत म्हणजे काँग्रेसला मत असा प्रचार भाजप करत आहे. मतदान विरोधात जाईल इतकी भाजपबद्दल नाराजी नसल्याचे लोकांशी बोलताना जाणवते.
अंदाज काय?
nएलिसब्रिज, मणिनगर, नारणपुरा, ठक्करबापा नगर, साबरमती, अमराईवाडी, असरवा हे मतदारसंघ भाजपचे गड आहेत. तेथील विजयाबाबत भाजप निश्चिंत आहे.
n विरमगाम, साणंद, बापूनगर, दरियापूर, जमालपूर, दाणीलिमडा, धांदुका या सात जागा काँग्रेसने२०१७ मध्ये जिंकल्या होत्या. त्यातील एक किंवा दोन जागा यावेळी भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. २१ पैकी १५ जागा भाजप जिंकेल असा अंदाज आहे.
हार्दिक विरुद्ध हार्दिक
वीरमगाममध्ये गाजलेल्या पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल भाजपचे उमेदवार आहेत. काँग्रेसने गेल्यावेळी भाजपचा पराभव करणारे लखाभाई भारवाड यांना पुन्हा संधी दिली असली तरी हार्दिक यांच्या विजयाची भाजपला खात्री आहे. हार्दिक यांची मते खाण्यासाठी अन्य एक हार्दिक पटेल अपक्ष लढत आहेत.
आरोपीच्या मुलीला भाजपचे तिकीट
nगोधरा कांडाच्या वेळी नरोडा पाटिया कांडही चर्चेत राहिले. त्या केसमध्ये जामिनावर सुटलेले मनोज कुकराणी यांची डॉक्टर कन्या पायल कुकराणी या भाजप उमेदवार आहेत. त्या सर्वात तरुण उमेदवार आहेत.
n १९९०पासून भाजपने येथे पराभव पाहिलेला नाही. काँग्रेसने मेघराज डोडवाणी यांना उमेदवारी दिली आहे. सिंधी समाजाची मोठी मते इथे आहेत आणि हिंदी भाषकांचीही. आपने हिंदी भाषिक ओमप्रकाश तिवारी यांना उमेदवारी देत रंगत आणली आहे.
अमित शहा उमेदवार
अहमदाबादमधील एलिसब्रिज मतदारसंघात अमित शहा भाजपचे उमेदवार आहेत. केंद्रीय गृहमंत्री नव्हे तर हे आहेत अमित पोपटलाल शहा. ते पाचवेळा नगरसेवक, एकदा महापौरदेखील होते. ६३ व्या वर्षी ते प्रचारात झपझप फिरतात. त्यांचा उदंड उत्साह हा चर्चेचा विषय आहे.