चेन्नई : तामिळनाडूत उपराजधानी तयार करण्याची मागणी जोर धरीत आहे. अद्रमुक मंत्र्यांकडूनच ही मागणी जोरदारपणे केली जात आहे. शेजारील आंध्र प्रदेशने तीन राजधान्यांचे नियोजन केले असून, त्यानुषंगाने तामिळनाडूत ही मागणी समोर आल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.तामिळनाडूचे पर्यटनमंत्री वेल्लामंडी एन. नटराजन यांनी त्रिचिरापल्लीला दुसऱ्या राजधानीचा मान देण्याची मागणी केली आहे. हे माजी मुख्यमंत्री तथा अद्रमुकचे संस्थापक एम.जी. रामचंद्रन (एमजीआर) यांचेही स्वप्न होते, असे त्यांनी म्हटले आहे. नटराजन हे पूर्व त्रिचिरापल्ली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी सांगितले की, राज्यात उपराजधानी निर्माण करण्याची मागणी समोर येत असेल, तर त्रिची जिल्ह्याच्या वतीने मी मुख्यमंत्री एडाप्पडी के पलानीसामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीर सेल्वम यांना विनंती करतो की, आमची विनंती मान्य करण्यात यावी. तामिळनाडूची उपराजधानी होण्याचे सगळे गुण त्रिचीमध्ये आहेत. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्रिभुज प्रदेशातील एकमेव जिल्हा असल्यामुळे येथे पाण्याचीही कमी नाही.त्याआधी दोनच दिवसांपूर्वी महसूलमंत्री आर.बी. उदयकुमार यांनी मदुराईला दुसºया राजधानीचा दर्जा देण्याची मागणी केली होती. सहकारमंत्री सेल्लर राजू यांनी त्यांच्या मागणीला समर्थन दिले आहे. मदुराई जिल्ह्यातील अद्रमुक कार्यकर्त्यांनी यासंबंधीचा एक ठराव मंजूर करून पक्षश्रेष्ठींना पाठविला आहे. एक समिती स्थापन करून मदुराईला दुसरी राजधानी बनविणे शक्य आहे का, हे तपासून पाहण्याची मागणी या ठरावात करण्यात आली आहे.एमजीआर यांचे स्वप्नसहकारमंत्री राजू यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी आपले सर्व राजकीय निर्णय मदुराईतूनच घेतले. जागतिक तामिळ परिषद मदुराईत भरलेली आहे. मदुराईला उपराजधानी आणि त्रिचीला राजधानी करणे हे एमजीआर यांचे स्वप्न होते. तथापि, द्रमुक नेते करुणानिधी यांनी यास विरोध केला होता.
तामिळनाडूमध्ये उपराजधानी स्थापन करण्याची मंत्र्यांकडूनच जोरदार मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 5:33 AM