नेपाळसह उत्तर भारतातील अनेक राज्ये आणि तिबेटमध्ये आज सकाळी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. नेपाळमध्ये या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ७.१ एवढी मोजण्यात आली. तर तिबेटमध्ये या भूकंपाची तीव्रता ६.८ एवढी मोजण्यात आली. नेपाळ आणि तिबेटबरोबरच भारतातील दिल्ली, बिहार, सिक्कीम, उत्तर बंगालसह आणखी काही भागात या भूकंपाचे झटके जाणवले.
या भूकंपाचं केंद्र नेपाळ आणि तिबेटच्या सीमेजवळ असल्याची माहिती समोर आली आहे. भारतामध्ये बिहारमधील मोतिहारी आणि समस्तीपूरसह अनेक भागात सकाळी ६.४० वाजता अचानक भूकंपाचे धक्के जाणवले. जवळपाच पाच सेकंदांपर्यंत भूकंपाचे हे झटके जाणवले. नेपाळमध्ये या भूकंपाची ही तीव्रता ७.१ एवढी मोजण्यात आली. या भूकंपामुळे कुठल्याही प्रकारच्या जीवित किंवा वित्तहानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.
पृथ्वीमध्ये सात टेक्टॉनिक प्लेट्स आहेत. या प्लेट सतत फिरत राहतात. जेव्हा या प्लेट एकमेकांवर आदळतात, घासल्या जातात. तसेच एकमेकांवर चढतात किंवा एकमेकांपासून दूर जातात, तेव्हा जमीन हलायला लागते. त्यालाच भूकंप म्हणतात. भूकंपाची तीव्रता मापण्यासाठी रिक्टर या परिमाणाचा वापर केला जातो. त्याला रिक्टर मॅग्निट्युट स्केल असं म्हणतात.