नवी दिल्ली : एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत संपूर्ण देश ‘लॉकडाऊन’मध्ये बंद होता. या काळात कोणत्या वस्तू भारतीय बाजारांत विकल्या गेल्या, याची माहिती आता समोर आली आहे. त्यानुसार, लॉकडाऊनमध्ये ब्रेड, चीज, कॉफी आणि जॅम यांची जोरदार विक्री झाली. याउलट फ्रुटी केक आणि आइस्क्रीमचा बाजार बसला. लोकांनी हँड सॅनिटायझरची भरपूर खरेदी केली असली तरी अपेक्षेपेक्षा ती कमीच होती. या लोकांनी घरगुती कीटकनाशकांची जोरदार खरेदी केल्याचे दिसून आले.
कोरोना विषाणूच्या साथीमुळे लावण्यात आलेल्या दोन महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये लोकांचा खर्च अपेक्षेप्रमाणे कमी झाला. फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (एफएमसीजी) उत्पादक कंपन्यांना आपल्या विक्रीत चित्र-विचित्र कल पाहायला मिळाले. ठराविक श्रेणीतील वस्तूंची विक्री अचानक वाढली. बंगळुरूस्थित ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे ब्रेड, चीज आणि रस्क यांची विक्री आश्चर्यकारकरीत्या वाढली. नेहमी उच्च उलाढाल दर्शविणाऱ्या फ्रुटी केकची विक्री मात्र घसरली. हे केक साधारणपणे मुलांच्या टिफिनमध्ये दिले जातात. शाळा बंद असल्यामुळे त्यांची विक्री घसरली.
भारतातील सर्वांत मोठी एफएमसीजी कंपनी असलेल्या हिंदुस्तान युनिलिव्हरच्या (एचयूएल) किसान जॅम आणि सॉसेसची विक्री एप्रिल-जून या तिमाहीत वाढली. कंपनीचे लाईफबॉय सॅनिटायझर्स आणि हँडवॉशही चांगले विकले गेले. मुंबईस्थित गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स या कंपनीच्या घरगुती कीटकनाशकांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली. कोरोना विषाणूच्या भीतीने
लोकांनी ही कीटकनाशके मोठ्या प्रमाणात खरेदी केली. याच काळात उत्तर भारतात डासांचा उच्छाद झाला होता. डेंग्यू-मलेरियासारखे आजार दूर राहावेत, यासाठी लोकांनी घरगुती कीटकनाशके खरेदी करण्यास प्राधान्य दिले. कोलकता येथील आयटीसी लि. कंपनीची खाद्य वस्तू आणि वैयक्तिक स्वच्छता उत्पादने एप्रिलच्या मध्यापासून पुढे मोठ्या प्रमाणात विकली गेली. लोकांच्या दृष्टीने अकारण खर्चाच्या कक्षेत जाणारी उत्पादने पडून राहिली.
गुरगाव येथील नेस्टले कंपनीच्या इन्स्टंट नुडल्स आणि कॉफीला लॉकडाऊन काळातील तिमाहीत चांगली मागणी राहिली.ब्रिटानियाचे व्यवस्थापकीय संचालक वरुण बेरी यांनी सांगितले की, आमच्या ब्रेड आणि रस्कच्या विक्रीतील वृद्धी खूपच आक्रमक राहिली. त्यांनी बिस्किटांनाही मागे टाकले. आमच्या एकूण वृद्धीपेक्षाही ती अधिक होती. डेअरीमध्ये चीजची वृद्धी उत्तम राहिली. जे लोक घरात होते, त्यांनी जेवणाऐवजी ब्रेडला प्राधान्य दिल्याचे या विक्री कलावरून दिसते. मला वाटते की, ब्रेडचा घरगुती वापर जवळपास १०० टक्के होता. रस्कचा घरगुती वापर बिस्किटांच्या वापरापेक्षा किंचित अधिक होता.
एचयूएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता यांनी सांगितले की, जॅम आणि केचअप यांची लॉकडाऊन काळातील विक्रीतील वाढ अत्यंत नैसर्गिक होती. लोक आपल्या घरात कोंडून होते. मुलेही घरातच होती. त्यामुळे अशा वस्तूंची मागणी वाढणे नैसर्गिकच आहे.
एप्रिल-जून तिमाहीत एचयूएलचा वार्षिक आधारावरील शुद्ध नफा ७ टक्क्यांनी वाढून १,८८१ कोटी रुपये राहिला. या काळात कंपनीच्या आरोग्य, स्वच्छता आणि पोषण श्रेणीतील उत्पादनांची मागणीही चांगलीच वाढली. कंपनीच्या एकूण पोर्टफोलिओ ब्रँडमध्ये या श्रेणीतील उत्पादनांचा वाटा तब्बल ८० टक्के आहे. त्यामुळे या श्रेणीतील उत्पादनांच्या विक्रीतील वाढ कंपनीला फायदेशीर ठरली.
एचयूएलने आपल्या साठा देखभाल शाखेच्या कर्मचारी संख्येत एप्रिलमध्ये २० टक्के कपात केली होती. त्यात आता जवळपास अर्धी वाढ करण्यात आली आहे. कंपनी सॅनिटायझर आणि हँडवॉश यांच्या साठ्यात वाढ करीत आहे. कारण या उत्पादनांची मागणी वाढतच आहे. एका गुंतवणूक सादरीकरणानुसार, कंपनीची सॅनिटायझर्सची साठवण क्षमता आधीच्या तुलनेत १०० टक्के अधिक करण्यात आली आहे. हँडवॉशची साठवण क्षमता पाचपट वाढविण्यात आली आहे.
लोकांना रुग्णालयात जायचे नाही म्हणून...
गुड नाईट ब्रँडखाली घरगुती कीटकनाशके बनविणाºया गोदरेज कंझ्युमर्स प्रॉडक्टस्च्या कार्यकारी चेअरमन निसाबा गोदरेज यांनी सांगितले की, आमच्या घरगुती कीटकनाशकांच्या विक्रीत ३० टक्के वाढ झाली आहे. लोक मलेरिया अथवा डेंग्यूने आजारी पडून रुग्णालयात जाऊ इच्छित नाहीत. त्यामुळे आमची उत्पादने मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहेत.
ग्रामीण भागातून वाढली मागणी
नेस्टले इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायण यांनी सांगितले की, नेस्टले इंडियाचे दूध आणि इतर पोषण उत्पादने लॉकडाऊन काळात चांगली विकली गेली. मॅगीच्या विक्रीत २५ टक्के वाढ झाली. कॉफीची विक्रीही चांगली राहिली. ग्रामीण भागात तसेच टीअर-२, ३, आणि ४ श्रेणीतील शहरांतून मागणीत जोरदार वाढ झाली.
हॉटेल व्यवसायावर गंडांतर
आयटीसीच्या एकूण वार्षिक व्यवसायात एफएमसीजी व्यवसायाचा वाटा २५ ते ३० टक्के आहे. कंपनीच्या कंझ्युमर स्टेपल्स, खाद्य आणि वैयक्तिक स्वच्छता उत्पादनांची मागणी लॉकडाऊन काळात वाढली. आयटीसीच्या हॉटेलिंग व्यवसायाला मात्र लॉकडाऊनचा भयंकर मोठा फटका बसला आहे.
लस येईपर्यंतच राहील सॅनिटायझर्सची मागणी
एचयूएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता यांनी सांगितले की, सॅनिटायझर्सच्या विक्रीतील वाढ कायम स्वरूपी राहणार नाही. जोपर्यंत कोविड-१९ लस बाजारात येत नाही, तोपर्यंत ही मागणी राहील. त्यानंतर कमी होईल. लोक घरी बसल्यामुळे कित्येक श्रेणीतील उत्पादनांना फटका बसला आहे. बाहेर जाऊन खाण्यात येणाºया उत्पादनांना सर्वाधिक फटका बसला आहे. आइस्क्रीम, फूड सोल्यूशन्स आणि व्हेंडिग व्यवसाय याचा त्यात समावेश आहे.