ओडिशाच्या नबरंगपूर जिल्ह्यातील एक ७० वर्षीय आजी वृद्धापकाळात निवृत्तिवेतन मिळविण्यासाठी संघर्ष करत आहेत. पेन्शनचे पैसे मिळवण्यासाठी कडक उन्हात तेही अनवाणी आणि तुटलेल्या खुर्चीच्या साहाय्याने काही किलोमीटर रस्त्यावरून पायपीट करत त्या बँकेत पोहोचल्या. रिपोर्ट्सनुसार, सूर्या हरिजन असे आजींचे नाव आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने त्यांचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो तुफान व्हायरल होत असून नेटकरी त्याखाली अनेक प्रतिक्रिया देत आहेत. सरकार पूर्वी रोख पेन्शन देत असे, परंतु भ्रष्टाचार रोखण्यासाठी आता पेन्शन थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येते, असे व्हिडीओमध्ये सांगितले आहे. तर, सूर्याला यापुढे बँकेत यावे लागणार नाही, तिला अशा समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी पावले उचलण्यात येतील असे आश्वासन बँक व्यवस्थापकाने दिल्याची माहितीही व्हिडीओमध्ये देण्यात आली आहे.