नवी दिल्ली - गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. सध्या दिल्लीत संसदेच्या अधिवेशनानिमित्त महाराष्ट्रातील खासदार दिल्लीत आहेत. यावेळी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी खासदारांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सत्तासंघर्षावर मनसोक्त भाष्य केलं.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्यातील सत्तासंघर्ष रोमांचक होता, थ्रीलर सिनेमासारखा होता, आता काय होईल, दुपारी काय होईल, संध्याकाळी काय होईल हेच सुरु होतं. पवारांना भेटायला जायचो तेव्हा टोपी लागेल की टोपी लावतील अशी चर्चा लोकांमध्ये होती. या सर्वामध्ये ३०-३२ दिवस गेले, कोणाचा विश्वास नव्हता काय होईल, मी स्वप्नात पण बडबडायचो मुख्यमंत्री आमचाच होणार. घरातले बोलायचे बाबा तुम्हाला वेड लागलंय का? शेवटपर्यंत ही गोष्ट आपण सगळ्यांनी पुढे नेली. हा सिनेमा रोमांचक, भयपट म्हणा, थरारक असा होता असं त्यांनी सांगितले.
तसेच अजित पवारांनी शपथ घेतली, सकाळी सकाळी अंघोळ करुन बसलो तेवढ्यात एकाने सांगितले अजित पवारांनी शपथ घेतली, मी म्हटलं की, मागची क्लीप असेल, हा फाजिल आत्मविश्वास होता. शरद पवारांवर आमचा विश्वास होता. शरद पवारांनी मनात आणलं आपल्याला हे करायचं आहे, तर ते पूर्ण करण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात. पवारांचा शब्दा होता फडणवीसांना घरी बसवायचा, साताऱ्यात पावसातही कमिटमेंट केली होती अशा शब्दात संजय राऊत यांनी शरद पवारांचे कौतुक केले.
दरम्यान, गेल्या ३६ दिवसाचा खेळ कमिटमेंटचा खेळ होता. आमदारांना सांभाळण्याची जबाबादारी सगळ्यांनी पार पाडली. माझ्यावरही दबाव होता आपल्यामुळे नुकसान होत नाही का? शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखविला. महाराष्ट्रात परिवर्तन झालं त्याने देशाला दिशा दिली. महाराष्ट्राने भीती मारली. संपविली त्याचे श्रेय महाराष्ट्राला आणि आपल्या सगळ्यांना जातं असंही संजय राऊत म्हणाले. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आल्यानंतर या तिन्ही पक्षाचे खासदार या मैफिलीला उपस्थित होते. त्यावेळी सत्तासंघर्षाचा ताणतणाव विसरुन यांनी भोजनाचा आस्वाद लुटला.