लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: जे विद्यार्थी नियमित वर्गांमध्ये जाणार नाहीत, त्यांना १२वी बोर्डाच्या परीक्षेत बसण्याची परवानगी मिळणार नाही, असा इशारा डमी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीबीएसईने दिला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, डमी शाळांमध्ये प्रवेश घेतल्याच्या दुष्परिणामांची जबाबदारी स्वत: विद्यार्थी व त्यांच्या पालकांची असेल.
सीबीएसई डमी शाळांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या अंतर्गत अशा विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेला बसण्यापासून रोखण्यासाठी परीक्षा उपनियमांत बदल करण्यावर विचार करीत आहे. त्यांना एनआयओएसची परीक्षा द्यावी लागेल. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एखादा परीक्षार्थी शाळेतून गायब असल्याचे आढळल्यास किंवा बोर्डाकडून करण्यात आलेल्या अचानक निरीक्षणात अनुपस्थित असल्यास अशा विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा देण्याची परवानगी देण्यात येणार नाही. नियमितरीत्या वर्गात न जाण्याचे दुष्परिणाम भोगण्यास संबंधित विद्यार्थी व त्याचे पालक जबाबदार असतील.
अलीकडेच बोर्डाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला व हा निर्णय २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षात लागू करावा, अशी शिफारस करण्यात आली होती.
वर्गात ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य
अधिकाऱ्याने सांगितले की, परीक्षा समितीमध्ये या मुद्द्यावर तपशीलवार चर्चा करण्यात आली व बोर्डाच्या परीक्षेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात यावी, असा निष्कर्ष काढण्यात आला. अपेक्षित उपस्थिती पूर्ण न झाल्यास केवळ गैरउपस्थिती असणाऱ्या शाळांमध्ये नामांकन घेतल्यामुळे असा विद्यार्थी सीबीएसई परीक्षा देण्यासाठी पात्र ठरत नाही.
२५ टक्के सूट कोणाला मिळणार?
सीबीएसईकडून परवानगी दिली न गेल्यास विद्यार्थी परीक्षेला बसण्यासाठी एनआयओएसशी संपर्क साधू शकतो. बोर्ड केवळ वैद्यकीय आपत्कालीन स्थिती, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रीडा आयोजनांत सहभागी झाल्यास किंवा अन्य गंभीर कारणांसारख्या प्रकरणांतच २५ टक्के सूट दिली जाण्याबाबत चर्चा करण्यात आली.
...तर शाळांवर शिस्तभंगाची कारवाई
ज्या विद्यार्थ्यांची अपेक्षित उपस्थिती भरणार नाही, बोर्ड त्यांच्या पात्रतेवर कोणताही विचार करणार नाही. तसेच अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नोंदणीकृत करणाऱ्या शाळेच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाईही केली जाऊ शकते का, यावर बोर्डाचा विचार सुरू आहे.
असे का करतात?
अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेश परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी डमी शाळांमध्ये प्रवेशास प्राधान्य देतात जेणेकरून ते केवळ त्या परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करू शकतील. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी राज्य-विशिष्ट कोट्याचा फायदा घेण्यास इच्छुक विद्यार्थीदेखील डमी शाळांची निवड करतात. ते वर्गात जात नाहीत आणि थेट बोर्डाच्या परीक्षांना बसतात. त्यांना फटका बसेल.
अत्यंत योग्य निर्णय
विद्यार्थ्यांचा खाजगी क्लासकडे असलेला कल पाहता सीबीएसईने घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे. विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊनच शिकले पाहिजे. सीबीएसईचा अभ्यासक्रम तर जेईई, नीट परीक्षांसाठी पुरक असाच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खाजगी क्लासेसपेक्षा वर्गातील शिक्षणाला महत्व दिले पाहिजे. त्याच धर्तीवर राज्य मंडळानेही राज्यात असाच निर्णय घेतला पाहिजे. राज्य मंडळाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयातही जेईई, नीट परीक्षांच्या धर्तीवर अभ्यासक्रम बनविले पाहिजेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल आणि शिक्षक अपडेट होतील.