नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअममध्ये 'परीक्षा पर चर्चा' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. मोदींनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्यावेळी तणावमुक्त कसे राहाल, याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एका अकरावीच्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला. त्या विद्यार्थ्याचा प्रश्न व त्या प्रश्नावर मोदींनी दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय आहे.
अकरावीच्या विद्यार्थ्याने मोदींना विचारलं की, पुढील वर्षी (2019मध्ये) माझी बोर्डाची परीक्षा आहे आणि पुढील वर्षीच लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यासाठी तुमची तयारी कशी सुरू आहे? विद्यार्थ्याच्या या प्रश्नावर नरेंद्र मोदींनी हसून उत्तर दिलं. 'जर मी तुझा गुरू असतो तर तुला पत्रकार बनण्याचा सल्ला दिला असता. कारण पत्रकारच असे प्रश्न फिरवून विचारू शकतात. मोदी म्हणाले, निवडणूक असो वा परीक्षा दोन्ही वेळी वेळेचा पुरेपुर उपयोग करा, तुम्ही शक्ती भरपूर वापरा. परीक्षा वर्षातून एकदाच येते. तुला बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा! माझ्याबरोबर सव्वाशे कोटी लोकांचे आशिर्वाद आहेत. माझ्यासाठी तिच ताकद आहे, असं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं.
आत्मविश्वास म्हणजे बाजारात विकत मिळणारे औषध नव्हे- नरेंद्र मोदीआत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. मात्र, तो कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांना दिला. ते शुक्रवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी देशभरातील विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारले. यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्यावेळी तणावमुक्त कसे राहाल, याबद्दल मार्गदर्शन केलं. मी आज तुमच्याशी पंतप्रधान म्हणून नव्हे तर एक मित्र म्हणून बोलत आहे. आज तुम्ही माझी परीक्षा घेणार आहात आणि मला गुण देणार आहात. आयुष्यात स्वत:मधला विद्यार्थी कधीच मरून देऊ नका, त्यामुळे माणसाला जगण्याची ताकद मिळते, असे सांगत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. विद्यार्थी एरवी विद्येची देवता असणाऱ्या सरस्वतीची उपासना करतात. मात्र, परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांनी हनुमानाची उपासना करावी, असे मोदींनी सांगितलं.