ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. २९ - गोमांस बंदी व हिंदीची सक्ती यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणा-या विद्यार्थी संघटनेवर आयआयटी मद्रासच्या प्रशासनाने बंदी घातली आहे. या संघटनेने विद्यार्थ्यांना धमकावल्याचा दावाही आयआयटी प्रशासनाने केला आहे. विद्यार्थी संघटनेने आयआयटीचे नियम डावलून टीका टिप्पणी केल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचे आयआयटी मद्रासचे डीन के. राममूर्ती यांनी सांगितले. दरम्यान, आयआयटी मद्रास ही स्वायत्त संस्था असून त्या संस्थेच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे आचरण व्हायला हवे असे मत मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले.
आयआयटी मद्रासच्या प्रशासनाकडे काही दिवसांपूर्वी पत्राद्वारे तक्रार करण्यात आली होती. यात आंबेडकर पेरियार स्टूडंट सर्कल या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याचे म्हटले होते. आंबेडकर पेरियार स्टूडंट सर्कलची (एपीएससी) स्थापना डिस्कशन फोरम म्हणून झाली असून आंबेडकर पेरियार विचारधारेचा प्रचार व प्रसार करणे या फोरमचे उद्दीष्ट आहे. हिंदीची सक्ती, गोमांस बंदी या निर्णयावरुन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोदी सरकारविरोधत भडकावण्याचा ठपकाही एपीएससीवर ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात मद्रास आयआयटीने मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे मत मागवले होते. यानंतर आता एपीएससी या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमुळे एपीएससीला आयआयटीतील कोणत्याही सुविधेचा वापर करात येणार नाही. प्रशासनाने आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधीच दिली नाही असा दावा एपीएससीच्या पदाधिका-यांनी केला आहे. आमच्या हक्कांवर गदा आल्याचे सांगत याबाबत संघर्ष करणार असल्याची भूमिका संबंधित विद्यार्थ्यांनी घेतली आहे.