तिरुपती : अयोध्येतील राम मंदिराच्या सेवेसाठी निवडण्यात आलेल्या ५० पुजाऱ्यांत येथील श्री व्यंकटेश्वरा वैदिक विद्यापीठातून (एसव्हीव्हीयू) पदव्युत्तर पदवी मिळविलेल्या मोहित पांडे यांचा समावेश आहे. मोहित यांच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. राणी सदाशिव मूर्ती यांनी आनंद व्यक्त केला आहे. विद्यापीठातील अनेक विद्यार्थी विविध मंदिरांत पुजारी म्हणून सेवा करत आहेत, असे ते म्हणाले.
मोहित यांचा मृदुभाषी स्वभाव आणि अभ्यासाप्रति समर्पण यामुळे त्यांना प्रतिष्ठित अयोध्या राम मंदिरात प्रभू रामाच्या सेवेची संधी मिळाली. राम मंदिरात येत्या जानेवारीत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या पुजारी पदासाठी तब्बल तीन हजार अर्ज आले होते. त्यात मोहित पांडे यांचा समावेश होता. ते मूळचे उत्तर प्रदेशातील लखनौचे रहिवासी आहेत. सहा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांची प्रभू श्रीरामांचे पुजारी म्हणून नियुक्ती झाली. आचार्य पदवी प्राप्त केल्यानंतर ते पीएचडीचीही तयारी करत आहेत. (वृत्तसंस्था)
चार हजार हिंदू धर्मगुरू; २५ हजार मान्यवर येणार
२२ जानेवारी रोजी अयोध्येतील मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे, असे राम मंदिर विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले होते.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी १३६ सनातन परंपरांतील ४ हजारांहून अधिक हिंदू धर्मगुरूंना निमंत्रित करण्याची विश्वस्त मंडळाची योजना आहे. याशिवाय अन्य २५ हजार मान्यवरही या सोहळ्यात सहभागी होणार आहेत, असे सांगण्यात आले.