KIIT University Suicide Case: ओडिशातील भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी विद्यापीठात गोंधळ सुरू आहे. मुलींच्या वसतिगृहात बीटेकच्या तृतीय वर्षाच्या एका विद्यार्थिनीने रविवारी सायंकाळी आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर काही तासांनी विद्यापीठाने सर्व नेपाळी विद्यार्थ्यांना तातडीने कॅम्पस रिकामे करण्याचे आदेश दिले. नेपाळी विद्यार्थ्यांना घाईघाईने सामान भरून तिकिटांशिवाय बस आणि ट्रेनमध्ये पाठवण्यात आले. विद्यापीठाच्या या कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ओडिशातील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील बी.टेकच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनीने तिच्या वसतिगृहात आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. प्रकृती लमसाल असे नेपाळमधील विद्यार्थिनीचे नाव आहे. दुसरीकडे विद्यापीठाने नोटीस बजावत नेपाळमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचे म्हटलं. नेपाळमधील सर्व विद्यार्थ्यांना १७ फेब्रुवारी रोजी वसतिगृहे तातडीने रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर नेपाळी विद्यार्थ्यांना घाईघाईने त्यांचे सामान बांधण्यास भाग पाडले आणि त्यांना विद्यापीठाच्या बसमधून कटक रेल्वे स्थानकावर जबरदस्तीने पाठवण्यात आले.
त्यानंतर नेपाळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनावर हे प्रकरण दडपल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाच्या तपासात पारदर्शकता आणावी अशी त्यांची मागणी आहे. दुसरीकडे, आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीच्या मित्रांनी आरोप केला की, तिचा माजी प्रियकर अद्विक श्रीवास्तवच्या छळामुळे तिने हे पाऊल उचलले. विद्यार्थिनीच्या भावानेही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
भुवनेश्वरचे पोलिस उपायुक्त पिनाक मिश्रा म्हणाले की, एका विद्यार्थीनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आम्ही इन्फोसिटी पोलीस ठाण्यात विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी विद्यार्थ्याचा मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर गॅजेट्स जप्त केले आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत."
दरम्यान, तणावामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीने विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाकडे मदत मागितली होती. परंतु कोणतीही मदत मिळाली नाही, असा आरोपही अनेक विद्यार्थ्यांनी केला आहे. मानसिक दबावामुळे तिने हे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे सहकारी विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर विद्यापीठात प्रचंड निदर्शने सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.