बलवंत तक्षक चंदीगड : ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या अकरावीतील नेहाला नेटवर्क मिळावे म्हणून अभ्यासासाठी झाडावर चढून बसावे लागते. ती रोज सकाळी एका हातात मोबाइल व दुसºया हातात वही घेऊन झाडावर चढून बसते आणि मग तिच्या अभ्यासाला सुरुवात होते.
हरयाणातील पंचकुला जिल्ह्याच्या मोरनी क्षेत्रातील मांजी गावात नेटवर्कची अडचण आहे. ठंडोग शाळेत शिकणारी नेहा ही अशी एकटीच विद्यार्थिनी नाही. त्याच गावातील दहावीत शिकणारी वर्षा, आठवीमध्ये शिकणारी कशिश, सातवी शिकणारा मनीष, दिव्य, नवीन हे सारेच झाडांवर बसून ऑनलाइनशिक्षण घेत आहेत. राज्यातील अनेक भागांत नेटवर्कची समस्या आहे. केवळ त्याच गावातील हा प्रश्न नसून, अनेक गावांत हाच प्रकार सुरू आहे. कोरोनाच्या संकटामुळे शाळा व महाविद्यालये बंद आहेत. अनेक राज्यांत नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे आणि तिथे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. अनेक ठिकाणी आॅनलाइन शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत.