नवी दिल्ली - आपल्या देशात शिक्षणव्यवस्थेचा मांडला गेलेला बाजार ही आता नवी बाब राहिलेली नाही. त्यामुळे गुणवत्ता नसलेल्यांनाही पैशाच्या बळावर उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळतो. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2017 साली एमबीबीएससाठी झालेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये NEET परीक्षेत शून्य तसेच दहापेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित होणाऱ्या NEET परीक्षेत फिजिक्स आणि केमेस्ट्री या विषयांमध्ये सुमारे 400 विद्यार्थ्यांना दहापेक्षा कमी तर 110 विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले. मात्र या सर्व विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्यामुळे जर शून्य गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असेल तर ही परीक्षा आयोजित करण्याचे औचित्यच काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने 2017 साली वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आणि 150 हून कमी गुण असलेल्या 1990 विद्यार्थ्यांच्या गुणांचे विश्लेषण केले होते. त्यामधून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या विद्यार्थ्यांच्या गुणांची पडताळणी केली असता 530 विद्यार्थ्यांना फिजिक्स आणि केमेस्ट्री किंवा दोन्ही विषयांत दहापेक्षा कमी किंवा शून्य गुण मिळाल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला सामुहिक प्रवेश परीक्षेसाठी बनवण्यात आलेल्या नियमानुसार प्रत्येक विषयात किमान 50 टक्के गुण मिळवणे अनिवार्य केले होते. मात्र नव्या नियमावलीमध्ये पर्सेंटाइल सिस्टिमचा स्वीकार करण्यात आला असून, या नियमानुसार अनिवार्य गुणांचा नियम रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये शून्य किंवा एकेरी गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळू लागला आहे.
शिक्षणाच्या आयचा घो! NEET परीक्षेत भोपळा तरी मिळाला MBBS ला प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 11:24 AM