नवी दिल्ली: ट्विटरवर प्रचंड सक्रिय असलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना आतापर्यंत अनेकांनी आपल्या समस्या सांगितल्या आहेत. स्वराज यांनीही तात्काळ प्रतिसाद देत या समस्या सोडविण्याची बाब काही नवीन राहिलेली नाही. मात्र, गुरूवारी ट्विटर पोस्टवर घडलेल्या एका प्रसंगाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. यानिमित्ताने पुन्हा एकदा सुषमा स्वराज यांचा हजरजबाबीपणा आणि सजगतेचा प्रत्यय आला. अतिक शेख या काश्मिरी तरुणाचे ट्विट यासाठी निमित्त ठरले. या तरूणाने ट्विटरवरून सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली होती. या ट्विटमध्ये त्याने म्हटले होते की, मी जम्मू-काश्मीरमधील असून सध्या फिलीपाईन्समध्ये वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेत आहे. माझा पासपोर्ट खराब झाला आहे. त्यासाठी मी महिनाभरापूर्वी अर्जही केला होता. वैद्यकीय तपासणीसाठी मला तातडीने घरी जाणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही नवा पासपोर्ट मिळवून देण्यात माझी मदत करावी, असे अतिक शेख याने ट्विटमध्ये म्हटले होते. सुरूवातीला हा संदेश पाहून सुषमा स्वराज नेहमीप्रमाणे त्याला मदत करतील, असे सगळ्यांना वाटले. परंतु, स्वराज यांनी या तरूणाला पद्धतशीरपणे दिलेले उत्तर पाहून अनेकजण अवाक झाले. हा तरूण मुळचा काश्मीरचा असला तरी त्याने आतापर्यंत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अनेकदा पाकिस्तानी नेत्यांचे समर्थन केले आहे. याशिवाय, आपण 'इंडिया ऑक्युपाईड काश्मीर' (IOK) असल्याचा उल्लेखही त्याने ट्विटरवर केला होता. हाच धागा पकडत सुषमा स्वराज यांनी या तरूणाची अक्षरश: झाडाझडती घेतली. स्वराज यांनी आपल्या उत्तरात म्हटले की, तू जम्मू-काश्मीरचा असशील, तर तुला नक्की मदत केली जाईल. परंतु तुझ्या प्रोफाईलवर नमूद केलेल्या माहितीनुसार, तू 'इंडियन ऑक्युपाईड काश्मीरमध्ये' राहणारा दिसतोस. असे कोणतेही ठिकाणच अस्तित्त्वात नाही, असे सांगत स्वराज यांनी या तरुणाला निरुत्तर केले. या सगळ्या प्रकारानंतर संबंधित तरुणाने आपले ट्विट डिलीट केले.
'त्या' शब्दावरून सुषमा स्वराजांनी घेतली काश्मिरी तरुणाची 'झाडाझडती'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 4:10 PM