Delhi School Bomb Threats : दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादमधील अनेक शाळांना बुधवारी सकाळी बॉम्बच्या धमक्या मिळाल्यानंतर शाळा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि पालकांमध्ये घबराट पसरली आहे. बॉम्बच्या धमक्या असलेले ईमेल दिल्ली-एनसीआरमधील अनेक शाळांना पाठवण्यात आले होते. पोलीस तपासात मात्र शाळांना पाठवलेले ईमेल फसवे असल्याचे समोर आलं आहे. अशातच नवी दिल्लीतील शिक्षण संचालनालयाने एक पत्रक काढून पालकांना आणि विद्यार्थ्यांना शांत राहण्याचे आणि विश्वास ठेवण्याचे आवाहन केलं आहे.
सकाळच्या सुमारात दिल्ली-एनसीआरमधील सुमारे 90 शाळांना ईमेद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या कॅम्पसमधून त्वरित बाहेर काढण्यात आले. बॉम्बच्या धमकीची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना घरी आणण्यासाठी शाळांमध्ये धाव घेतली. दुसरीकडे दिल्ली पोलिसांसह विशेष पथकांनी शाळांमध्ये शोधकार्य सुरु केलं मात्र कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे ही केवळ एक अफवा असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटलं. मात्र या सगळ्याप्रकारामुळे विद्यार्थ्यी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे नवी दिल्लीतील शिक्षण संचालनालयाने एक प्रसिद्धीपत्रक काढून काळजी करण्याची गरज नसल्याचे म्हटलं आहे.
काय म्हटलंय प्रसिद्धीपत्रकात?
"आज पहाटे, दिल्लीतील अनेक शाळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या, ज्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी आणि पालकांमध्ये चिंता निर्माण झाली. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी परिस्थितीला तत्परतेने हाताळण्यासाठी जलद आणि निर्णायक काम केलं. याबाबत दिल्ली पोलिसांना ताबडतोब सूचना देण्यात आली. त्यानंतर अशा सर्व शाळांची सखोल तपासणी दिल्ली पोलिसांनी शाळेच्या अधिकाऱ्यांसोबत खबरदारी घेत केली. या तपासणीत कोणत्याही संशयास्पद वस्तू किंवा हालचाली आढळल्या नसल्याची माहिती देण्यात आली आहे. आमचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सुरक्षित आहेत. आमचे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांची सर्व सुरक्षितता आणि कल्याण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे याची आम्ही खात्री देऊ इच्छितो. विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयी आणि सुरक्षिततेची खात्री करून, जिथे पालक आले असतील ते ठिकाण सोडण्याची परवानगी होती. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. सर्व संबंधित म्हणजे शाळा अधिकारी, दिल्ली पोलीस आणि पालकांनी वेळेत प्रतिसाद दिला आहे. अशा घटनांमुळे निर्माण होणारी चिंता आम्ही समजून घेत असताना आम्ही पालकांना शांत राहण्याचे आवाहन करतो आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सर्व संबंधितांनी केलेल्या उपाययोजनांवर विश्वास ठेवतो. सर्व काही सामान्य असून कोणीही कोणत्याही प्रकारची दहशत पसरवू नये, असे आम्ही पुन्हा सांगत आहोत," असे या निवेदनात म्हटलं आहे.
धमकीच्या ईमेलमध्ये काय लिहीलं होतं?
'आमच्या हातात लोखंड आहे, ज्यामुळे हृदयाला शांती मिळते. आम्ही तुम्हाला हवेत फेकून देऊ आणि तुमच्या शरीराचे तुकडे करू. आम्ही तुमच्या मानेचे आणि चेहऱ्याचे तुकडे करू. इंशा अल्लाह आम्ही तुम्हा सर्वांचे गळे आणि तोंड फाडून टाकू. जर अल्लाहची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला आगीच्या ज्वाळांमध्ये पाठवू, ज्यामुळे तुमचा श्वास गुदमरेल. काफिरांसाठी नरकात वेगळी जागा आहे. काफिर, तु्म्ही या आगीत जळताल,' असे या ईमेलमध्ये म्हटलं होतं.