हाथरस : उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील एका प्राचार्याने विद्यार्थ्यांची जातीच्या आधारे केलेली विभागणी अंगलट आली आहे. प्रशासनाने या प्राचार्याला तडकाफडकी पदावरून हटविले आहे.प्राचार्य राधेश्याम वर्षने यांनी विद्यार्थ्यांची अनुसूचित जाती, मागासवर्गीय आणि सर्वसाधारण अशा जातीनुसार वर्गाच्या ए, बी, सी सेक्शनमध्ये विभागणी केली होती. शिक्षकांची नेमणूक करतानाही जात हाच निकष पाळत अंकगणित जुळविणाऱ्या या प्राचार्याविरुद्ध असंख्य तक्रारी दाखल झाल्या होत्या. वर्षने हे सेठ पुलचंद बागला इंटर कॉलेज या शासकीय अनुदानित शाळेवर प्राचार्य होते. पालकांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी अविनाश कृष्णा सिंग यांनी शाळेच्या जिल्हा निरीक्षकाकडून (डीआयओएस) तपासणीचे आदेश दिले होते.वर्गात ज्या जातींचे विद्यार्थी त्याच जातीचे तीन शिक्षक नेमण्यात आल्याचे चौकशीत आढळून आले. या तिघा शिक्षकांनाही हटविण्यात आले. ए सेक्शनमध्ये सर्वसाधारण श्रेणीतील व उच्च जातीचे विद्यार्थी आढळले. बीमध्ये ओबीसी तर सीमध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा भरणा करण्यात आल्याचे चौकशीत आढळून आले. (वृत्तसंस्था)
विद्यार्थ्यांची जातीय विभागणी अंगलट
By admin | Published: May 14, 2016 3:12 AM