दमोह - मध्य प्रदेशच्या दमोहमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो. सरकारी शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नदीवर पूल नसल्यामुळे रोज जीव धोक्यात घालून नदी ओलांडून शाळेत जावे लागत आहे.
विद्यार्थ्यांना या जीवघेण्या प्रवासाबाबत विचारलं असता पावसाळ्यात शाळेत जाण्यासाठी नदीवर पूल नसल्यामुळे असंख्य अडचणी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. नदीतील पाण्याचा प्रवाह हा वेगात असल्याने नदी पार करणं ही एक मोठी समस्या असते. त्यामुळे कित्येकदा विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. परिणामी या सर्व गोष्टीचा फटका हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर बसतो आणि त्याचं शैक्षणिक नुकसान होतं.
विद्यार्थ्यांना होणाऱ्या या त्रासामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही समस्या लवकर सोडवावी यासाठी जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहीलं आहे. नदीवरील पूलाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारलं असता ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पूलाच्या बांधकामाला उशीर होत असल्याचं सांगितलं जातं.