चंदीगड: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीजवळ अभिनव पद्धतीनं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 12 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. पंतप्रधानांची सभा संपताच या विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली. पकोडा विकणं हादेखील रोजगाराचाच भाग असतो, असं विधान मोदींनी गेल्या वर्षी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. त्या विधानाचा इंजिनीयरिंग आणि लॉच्या विद्यार्थ्यांनी अभिनव पद्धतीनं निषेध केला. 'पकोडा योजने'च्या अंतर्गत आम्हाला नवा रोजगार देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत, असं पकोडा विकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं. 'आम्ही मोदींच्या जनसभेत पकोडा विकू इच्छितो. शिक्षित तरुणांना पकोडा विकताना किती छान वाटतं, हे पंतप्रधानांना समजावं, यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत,' असंदेखील विद्यार्थी म्हणाले. या अनोख्या आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात विद्यार्थी 'मोदी पकोडा' विकताना दिसत आहेत. मोदींच्या विधानाचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पकोडे विकले. यामध्ये इंजिनीयर, बीए, एलएलबी पकोड्यांचा समावेश होता. मोदींनी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पकोड्यावर भाष्य केलं होतं. त्या मुलाखतीत मोदींनी रोजगारावर प्रश्न विचारला. त्यावर 'तुमच्या वृत्तवाहिनीच्या स्टुडिओजवळ एखादी व्यक्ती पकोडे विकून दिवसाला 200 रुपये कमावत असेल, तर तो रोजगार नाही का?', असा सवाल मोदींनी उपस्थित केला होता. मोदींच्या या विधानावर विरोधकांनी टीका केली होती.
पंतप्रधानांच्या रॅलीजवळ 'मोदी पकोडा' विकला; इंजिनीयरिंगचे विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 10:42 AM