- सुरेश भटेवराल्ल, नवी दिल्ली
चर्चेद्वारे आंदोलने टाळते येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची आंदोलने टाळण्यासाठी आपण त्यांच्याशी चर्चा करू, असे सांगून नवे मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिक्षण हा पक्षीय राजकारणाचा विषय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.जावडेकर यांना कॅबिनेट मंत्री करताना स्मृती इराणी यांच्याकडील मनुष्यबळ विकास खाते दिले आहे. ते गुरुवारी कारभार स्वीकारतील. सल्लामसलतीसाठी आपले दरवाजे कायम उघडे आहेत. मी विद्यार्थी आंदोलनातून आलो आहे. त्यामुळे आंदोलने होणारच नाहीत, याची मी दक्षता घेईन. इराणी यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. जेएनयू व हैदराबाद विद्यापीठातील आंदोलन तसेच अलिगड मुस्लीम विद्यापीठ, जादवपूर विद्यापीठ अशा प्रत्येक वादात इराणी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वाद निर्माण झाले. विरोधी पक्षांनी त्यांच्यावर त्या शिक्षणाचे भगवेकरण करीत असल्याचा आरोपही केला. अदाणी यांना दंड भरावाच लागेल पर्यावरणमंत्री असताना प्रकाश जावडेकर यांनी नरेंद्र मोदी यांच्या खास मर्जीतील अदाणी उद्योग समूहाला २00 कोटींचा दंड माफ केला होता, त्यामुळेच जावडेकर यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्री करण्यात आले, हा आरोप जावडेकर यांनी फेटाळून लावला आहे. अदाणी उद्योग समूहाला कोणतीही माफी देण्यात आलेली नाही. त्यांना २00 कोटींचा दंड भरावाच लागेल, असे जावडेकरांनी सांगितले. गौतम अदाणी नरेंद्र मोदी यांच्या जवळचे असल्याने जावडेकरांनी त्यांचा हरित कर माफ केल्याचा आरोप मंत्रिमंडळ फेरबदलानंतर झाला होता. विद्यार्थी आंदोलनातील सहभागजावडेकर हे महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांच्या पत्नीही अभाविपच्या काम करीत. आणीबाणीमध्ये अटक झालेल्या जावडेकर यांच्यावर तुरुंगात असताना मोठी हृदय शस्त्रक्रिया झाली. ती यशस्वी व्हावी, यासाठी तुरुंगातील राजकीय कैद्यांनी एक दिवस उपवास केला होता. आणीबाणी उठल्यानंतर ते जनता पार्टीचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले. त्याच काळात त्यांचा विवाह झाला. ते १९७५ पासून राजकारणात असून, सर्व पक्षांतील नेते व कार्यकर्त्यांशी उत्तम संबंध आहेत.